आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे पाऊल:महिला धोरणाची सनद प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण, एलजीबीटी समूहाचा समावेश करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना दिलेला समान हक्क, सन्मान, सुरक्षिततेच्या सनदेचे प्रकाशन करून राज्याच्या महिला व बालविकासमंत्री डॉ. यशोमती ठाकूर यांनी चौथ्या महिला धोरणाच्या मसुद्याची सनद प्रतापगडावर शिवचरणी अर्पण केली. एलजीबीटी समूहाचा महिला धोरणात समावेश करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. मात्र, तृतीयपंथी महिलांसाठीची मागणी असताना यात सरसकट एलजीबीटी या संपूर्ण समूहाचा उल्लेख केल्याने महिला संघटनांकडून हरकती घेतल्या जात आहेत.

एलजीबीजी समूहासाठी शासनाचे स्वतंत्र धोरण असावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. २०१८ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विकास अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी स्त्रियांचे प्रश्न व अधिकार यावर धोरण आखण्याच्या मागणीसाठी परिषद घेण्यात आली होती. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे स्वतंत्र धोरण आखावे व त्यांच्यासाठी योजना जाहीर कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, महिला धोरणाच्या सदर मसुद्यात बहुतांशी योजनांसोबत एलजीबीटी असे सरसकटीकरण करण्यात आल्याने अंमलबजावणीत गोंधळ आणि समूहांमध्ये संघर्ष निर्माण होण्याच्या शक्यतेने यावर आक्षेप घेण्यात येत आहे.

राज्यात स्वतंत्र धोरणाची गरज
महिला धोरणाच्या निमित्ताने राज्यातील सरकारने एलजीबीटी समूहाची दखल घेतली याचे स्वागत आहे, परंतु एलजीबीजी समूहापैकी फक्त ट्रान्सवुमन म्हणजेच तृतीयपंथी स्त्रियांचाच महिला धोरणात समावेश तर्कसंगत आहे. तथापि, संपूर्ण एलजीबीटी समूहासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे स्वतंत्र धोरण असावे, अशी मागणी आहे. - रेणुका कड, सामाजिक कार्यकर्त्या

ही तर भविष्यातील संघर्षाची नांदी
राज्य सरकारने ही दखल घेतली याचे स्वागत आहे. मात्र, सगळ्यांना एकत्र गुंडाळणे म्हणजे कुणालाच न्याय न देण्याची भूमिका आहे. दोन्ही समूहाचे प्रश्न भिन्न आहेत. प्रत्येक वाक्यात एक शब्द जोडून यात फक्त कागदी घोडे रंगवले आहेत. महिला व तृतीयपंंथीयांसाठी राज्य विधिमंडळात एक तृतीयांश जागा राखीव ठेवणे व्यवहार्य नाही. उलट, एकमेकांचे वाटेकरी केल्याने या समूहांमध्ये भविष्यात संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. - अॅड. निशा शिरूरकर, सामाजिक कार्यकर्त्या

प्रतापगडाचीच निवड का केली?
“या देशाला आधुनिकतेचा विचार देणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. शिवछत्रपतींनी रयतेसाठी राज्य केले. त्यांच्या स्वराज्यात महिलांना सदैव सन्मानाची वागणूक मिळाली. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन केले जाई. स्वतः महाराजांनी वेळोवेळी आपल्या वर्तणुकीतून महिलांच्या बाबतीत आदर्श घालून दिलेला आहे. शिवछत्रपती ते आजचा भारत व्हाया नेहरू असा भारताच्या पुरोगामीत्वाचा प्रवास आहे. त्याची आठवण म्हणून प्रतापगडावर हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे ॲड. ठाकूर या वेळी म्हणाल्या.

अंमलबजावणी व देखरेख : या धोरणाच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून त्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. ठाकूर यांनी या वेळी दिली. तसेच याच्या पूर्ततांवर देखरेखीसाठी महिला व बालविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र टास्क फोर्स नेमणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

२०११ च्या जनगणनेनुसार
महिला ५.४१ कोटी
तृतीयपंथी महिला ४.८७ लाख
एलजीबीटी समूहाचा समावेश करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य

बातम्या आणखी आहेत...