आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याच्या काळात वाचन थोडे कमी झाले होते. मात्र, मायबाप सरकारच्या कृपेमुळे अडीच वर्षे अनेक पुस्तके वाचायची संधी मिळाली. माझ्या अडीच वर्षांच्या अडचणीच्या कालावधीत पुस्तकांनीच मला तारून नेले, अशा आठवणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितल्या.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोठावळे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर, स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर, प्रा. मिलिंद जोशी, रवींद्र गुर्जर, राजीव बर्वे, विलास पोतदार, वसंत खैरनार, सुभाष सबनीस, शिरीष चिटणीस, जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह साहित्यिक, लेखक व प्रकाशक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना छगन भुजबळ म्हणाले की, लेखकांना लेखक म्हणून पुढे आणण्याचे काम प्रकाशक करतात. अख्खे जग आपल्याला पुस्तकात सापडते. हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच लेखक आणि वाचकाला जोडण्यासाठी प्रकाशक हा अतिशय महत्वाचा दुवा असून, पुस्तके ही समाज घडविण्याचे अतिशय मौलिक काम करतात.
प्रभू रामचंद्रासाठी जशी नाशिकची भूमी प्रसिद्ध आहे तशी ही भूमी ज्ञानपीठकार कुसुमाग्रज यांच्या नावाने देखील प्रसिद्ध आहे. विद्वान, लेखक, विचारवंत यांची परंपरा नाशिक शहराला लाभली असून कुसुमाग्रज, कानेटकरानी मराठी साहित्य विश्वाला वेगळ्या उंचीवर नेले असे त्यांनी यावेळी सांगितले.
भुजबळ म्हणाले की, साहित्यातून समाजाची सत्य परिस्थितीत समाजासमोर येते. प्रबोधनकार ठाकरे यांनी वाचाल तर वाचाल असे म्हटले आहे. ते अतिशय खरे असून वाचन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. महात्मा फुले यांनी तत्कालीन काळात समाजाच्या विरुद्ध जाणारी जी मत धाडसीपणे मांडली ती गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, तृतीयरत्न या सारख्या पुस्तकांतून पुढे आली. सावित्रीबाई फुले यांचे काव्य फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके आणि साहित्य सामाजिक परिवर्तनासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरली असे त्यांनी सांगितले.
भुजबळ म्हणाले की, पुस्तके आता ऑडिओ स्वरुपात उपलब्ध झाली आहेत. रोज या ऑडिओ बुक आपण दैनंदिन ऐकत असून पुस्तकांच्या बदललेल्या स्वरूपामुळे प्रिंटिंग पुस्तकांचे काय होईल, असा प्रश्न पडतो. परंतु जसे टीव्ही माध्यमे विकसित झाली तेव्हा वर्तमानपत्रांचे काय होईल असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, वर्तमानपत्रांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. तसेच स्थान पुस्तकही कायम ठेवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपर्यंत तीन वेळा नाशिकला झालेले आहे. नुकत्याच सन २०२१ साली झालेल्या भव्य दिव्य साहित्य संमेलनाचा नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. याची आठवणही त्यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली.
भुजबळ म्हणाले की, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही संघटना मराठी प्रकाशकांना लेखांना आणि वाचकांना विविध उपक्रमांच्या सहाय्याने जोडण्याचे आणि एकत्रित ठेवण्याचे कार्य गेली अनेक वर्ष करत आहे. लेखन संस्कृती आणि वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रकाशक संचाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अशाच विविध उपक्रमांपैकी एक असलेले लेखक प्रकाशक साहित्य संमेलन दरवर्षी घेण्यात येते. त्यांचा हा उपक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संघटित होऊन मागण्या पुढे आल्या तर त्या मागण्या मान्य होतात. त्यामुळे संघटित होऊन मागण्या मांडण्यात आल्या तर त्या नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.