आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यजित तांबे प्रकरणावर छगन भुजबळ स्पष्टच बोलले:तांबे काँग्रेसमध्ये परतणार नाही, आता यावर बाळासाहेब थोरात यांनी बोलावे

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्यजित तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत. यावर आता बाळासाहेब थोरात यांनी बोलले पाहिजे. खरे काय ते थोरात साहेबच सांगू शकतील. ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यावरून मला वाटते की, सत्यजित तांबे काँगेसमध्ये परतणार नाही. असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.

छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, डॉ. सुधीर तांबे हे तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांनी मतदार संघात चांगले काम केले. दोन महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना म्हणालो, तुम्हालाच निवडून देऊ. पण काँग्रेसमध्ये काय झाले, हे कळायला मार्ग नाही. ऐनवेळी जे झाले, ते विचित्र आहे. याच्यात कोण दोषी आहे, याचा अजून उलगडा झाला नाही. त्यात स्पष्टता आलेली नाही.

तांबेंनी मतदार नोंदणी मोठी केली

छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार यांनी निवडणुकीआधीच सांगितले होते कि, काँग्रेसने या सगळ्याचा विचार करुन हा घरातला प्रश्न घरात सोडवला पाहिजे. त्यावेळी शिवसेना आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. शुभांगी पाटील यांनी 40 हजार मते मिळवली. ती काही कमी नाही. महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. पण तांबेंनी मतदार नोंदणी मोठी केली होती. त्याचा परिणाम त्यांच्या विजयात झाला.

अशा प्रकारे एबी फॉर्म कोण देते?

छगन भुजबळ म्हणाले, मी गेली 56-57 वर्षे राजकारणात आहे. पण अशा प्रकारे एबी फॉर्म कोण देते आणि फॉर्म घेताना पाहत नाही, हे शक्य नाही. फॉर्म घेताना सर्व बारीक बाबी पाहिल्या जातात. मग अशावेळी असे कसे झाले? सत्यजित तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत. यावर आता बाळासाहेब थोरात साहेबांनी बोलले पाहिजे.

हवेने दिशा बदलली

छगन भुजबळ म्हणाले, सी व्होटरचा सर्व्हे आला तो सगळ्यांसाठी शॉकिंग आहे. त्यानंतर या निवडणूका झाल्या. नागपूर आणि अमरावतीमध्ये जो कौल आला, त्यावरून स्पष्टपणे कळते की, हवेने दिशा बदलली आहे. तसेच कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलाही फोन केला होता. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे बघतील काय करायचे ते. सर्व प्रमुख नेते बसून मार्ग काढतील.

बातम्या आणखी आहेत...