आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:मुख्यमंत्री शिंदेंची आज बैठक; भाजपला धक्का

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमधील भाजपाचे तिन्ही आमदार व शिंदे गट यांना एकत्र घेत बैठक घेऊन पाच तास उलटत नाही तोच खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईमध्ये उद्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक महापालिकेची बैठक बोलावून जोरदार धक्का दिला. या बैठकीचे निमंत्रण नसल्यामुळे शिंदे गटाचा ‘एकला चलो रे’ हा झेंडा पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्यामुळे भाजपाची अस्वस्थता वाढली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून भाजप व शिंदे गटामध्ये नाराजी नाट्य सुरू असून मध्यंतरी समझोता घडवण्यासाठी बऱ्याच नेत्यांनी पुढाकार घेतला. खुद्द पालकमंत्री भुसे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत समज गैरसमज दूर करत भाजप आमदारांना सन्मानाचे स्थान देत बैठक बोलावली. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि.३) नाशिक शहराच्या प्रश्नांवर महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात बैठक घेत प्रलंबित प्रस्ताव, योजनांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. भाजप आमदारांच्या खांद्याला खांदा लावून बसलेले गोडसे यांनी काही तासातच जोरदार धक्का देत अगदी दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (दि. ४) नाशिकच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात मंत्रालयात विशेष बैठक बोलावली.

भाजप आमदार फडणवीस, महाजनांकडे जाणार
महापालिकेत भाजपची सत्ता असताना मेट्रो तसेच अन्य महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. असे असताना शिंदे गट वर्चस्व दाखवत असल्यामुळे भाजप आमदार व शहराचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिकचे संपर्कमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जाण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता
असताना शिवसेना विरोधी पक्षात होती. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गोडसे यांचा भाजपशी अधिकृत संबंध संपुष्टात आला होता. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित प्रश्नांबाबत वाढता हस्तक्षेप भाजपला मान्य नसल्याची चर्चा आहे.

या मुद्द्यांवर होणार बैठकीत चर्चा
विविध समाजाेपयोगी कार्यासाठी नाशिक महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या मिळकतींना नाममात्र भाडे आकारण्यात यावे, बांधकाम परवानगी घेण्यासाठीची प्रक्रिया आॅनलाइनऐवजी आॅफलाइन करण्यात यावी, प्रलंबित नोकरभरती, स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही, स्मार्ट स्कूल आणि रखडलेल्या विकासकामांना गती द्यावी, सिंहस्थ काळात शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी बाह्यरिंग तयार करण्यात यावा आदी प्रश्नांसंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीला नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकंुडवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...