आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळीच्या रस्त्यामुळे नाशिककरांचे आरोग्य धोक्यात:पेठरोड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचे आंदोलन, लाेकप्रतिनिधी, प्रशासनाची आंदोलनाकडे पाठ

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून गुजरातकडे जाणाऱ्या पेठरोडच्या राऊ हॉटेल ते महापालिका हद्दिपर्यंत अक्षरश: चाळण झाली असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार निवेदने देवूनही रस्त्याचे काम होत नसल्याने संतप्त नागरिक सोमवारी रस्त्यावर उतरले.

पोलिसांनी त्यांना रास्तारोको करू दिला नसला तरी नागरिकांचा रोष पहाता कोणत्याही क्षणी पु्न्हा येथे आंदोलन हाेऊ शकते. विशेष म्हणजे, माजी नगरसेवक, लाेकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने मात्र या आदाेलनाकडे पाठ फिरवल्याचा तीव्र शब्दात येथे निषेध व्यक्त केला जात होता.

परिसरातील वैद्यकीय व्यवसायिक तसेच नागरिक व महिला मेघराज बेकरी समोर जमा झाले . तेव्हा त्याठिकाणी पेठरोड वासियांनी नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात तसेच लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तसेच जोपर्यंत नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी येत नाही तोपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल असे सांगितल्यावर पोलिसांनी त्याला विरोध केला .पण नागरिक पोलिसांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक साखरे यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वतः तुमची व मनपा प्रशासनाची चर्चा घडवून देतो असे सांगितल्यावरही काही व्यक्तींनी विरोध केल्यावर त्यांना पोलिसांनी पोलिस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. अखेर जर मनपाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात लक्ष न घातले नाही व प्रश्न मार्गी लावला नाही तर पुन्हा कोणालाही न सांगता नागरिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी दिला गेला.

आंदोलनात प्रभाकर पिंगळे, सोमनाथ पिंगळे , दिलीप पिंगळे, राजेंद्र ठाकरे, महेश शेळके, सुनील निरगुडे, प्रतीक पिंगळे, विजय पिंगळे, योगेश कापसे , पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सचिन देवरे, डॉ.सचिन भांबेरे, डॉ. हेमंत साबळे, डॉ.मनीष देवरे, सचिन पवार, दर्शन बोरसे , विलास आवारे आदींसह वेदनगरी, इंद्रप्रस्थनगर आदी भागातील महिला व नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित होते .

दहा दिवसांपूर्वीच नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांना पत्र देत महापालिकेकडे रस्ता काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसून स्मार्ट सिटी मार्फत रस्ता करण्याची मागणी केल्याचे सांगितल्याने नागरिक अधिक संतप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...