आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक शहरातील सिटी लिंकचे बस थांबे रिक्षाचालकांनी ताब्यात घेतले आहेत. परिणामी, बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षांमुळे बस थेट रस्त्यावर थांबवून प्रवाशांची चढ-उतार करावी लागत असल्याने वाहतूक काेंडीची समस्या निर्माण हाेत आहे.
विशेष म्हणजे, स्मार्ट रोडवरील सिटी लिंक शहर बससेवेचे थांबेही रिक्षांचे अड्डे झाले आहेत. बस थांब्याच्या पिवळ्या चौकोनात रिक्षा थांबत असल्याने या भागातही बस रस्त्याच्या मधोमध थांबतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक काेंडीची समस्या निर्माण हाेत आहे.
यासंदर्भात स्मार्ट सिटी वा वाहतूक पोलिस शाखेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत... शहरातील अनेक बस थांब्यांवर अनधिकृत पद्धतीने रिक्षा थांबे निर्माण झाले आहे. स्मार्ट रोड असलेला त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या रोडवर फुटपाथ, सायकल ट्रॅक बनविण्यात आला आहे.
त्याचबराेबर सिटी लिंक शहर बससाठी आकर्षक थांबे उभारण्यात येऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहून बस थांबण्यासाठी पिवळ्या पट्ट्यातील चौकोन आखण्यात आलेला आहे. परंतु, फुटपाथवर अनधिकृतरित्या दुचाकींची तर सायकल ट्रॅकवर चारचाकी वाहनांची सर्रासपणे पार्किंग केली जाते. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यानेच मार्गक्रमण करावे लागत असल्याने वाहनांना अडथळा निर्माण हाेताे. रिक्षाचालकांसाठी स्मार्ट रोडवरील त्र्यंबकनाका, सीबीएस आणि अशोकस्तंभ येथे अधिकृत रिक्षा थांबे आहेत. असे असतानाही रिक्षाचालक स्मार्ट रोडवर असलेल्या बस थांब्यावर प्रवाशांसाठी रिक्षा थांबवून ठेवतात.
त्यामुळे वाहतूक खोळंबून कोंडीची समस्या ही या रोडवर नित्याची झालेली आहे. डी. बी. स्टारने या रस्त्याची पाहणी केली असता वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे पोलिस प्रशासनासह स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून आले.
नागरिकप्रवाशांना उभे रहावे लागते उन्हात सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. स्मार्ट रोडवर सिटी लिंक बसचे थांबे आहेत. परंतु, या थांब्यांवरच रिक्षा थांबे आणि विक्रेत्यांचे बस्तान आहे. त्यामुळे प्रवाशांना थांब्यांच्या शेडमध्ये जागा रहात नसल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले. त्यामुळे त्यांना पादचारी रस्त्यावर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागते. तर, विद्यार्थी, प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक भरदुपारी उन्हात उभे राहतात.रिक्षांच्या गराड्यातून मार्ग काढत पकडावी लागते बस अनधिकृतपणे रिक्षा थांबे थाटून शहर बससेवेला अडथळा निर्माण करणाऱ्या या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे.
रिक्षांमुळे रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या बसपर्यंत वाट काढत बसमध्ये शिरावे लागते. ही कसरत करताना अनेकदा किरकोळ स्वरूपाचे अपघातही होतात. यातून भविष्यात गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.अतिक्रमणांमुळे त्रास सिटी लिंकच्या बस थांब्यांवर अतिक्रमणांसह रिक्षाचालकांचे अवैध थांबे निर्माण झाले आहे. यामुळे बसेस रस्त्याच्या मधोमध उभे करावे लागतात. यामुळे बसच्या मागे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. यासंदर्भात पोलिस खात्याला वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. याकडे आता पोलिस आयुक्तांना लक्ष देण्याची गरज आहे. - मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटी लिंक
पाेलिसांची नियुक्ती, मात्र कारवाई शून्य
शहरातील स्मार्ट रस्त्यांसह अनेक ठिकाणी सिटी लिंक बसच्या थांब्यांचा ताबा रिक्षाचालकांनी घेतलेला आहे. या ठिकाणी बस लावायला जागा रहात नाही यामुळे बसचालक रस्त्यांचे मधोमध बस थांबवतात. परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेष म्हणजे, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नलसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाहेर वाहतूक पोलिसांची नियुक्ती असतानाही त्यांच्याकडून या सिटी लिंकच्या बस थांब्यांवर उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कुठलीही कारवाई केली जात नाही.
पोलिसांनी लक्ष द्यावे शहरातील अनेक ठिकाणी बस स्टॉपवर रिक्षा थांबे झाले आहे. त्यामुळे बस ही थेट रस्त्याच्या मध्यभागी उभी करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते तसेच अपघाताच्या ही धोका असतो. वाहतूक पोलिसांनी या अनधिकृत रिक्षा थांब्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. - गणेश सोलापूरकर, नागरिक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.