आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक शहराची लाेकसंख्या साधारण २० ते २१ लाखांपर्यंत पाेहाेचली असताना शहरात केवळ २९ बालकेच शाळाबाह्य असल्याचे आश्चर्यकारक सर्वेक्षण महापालिकेने नेमलेल्या प्रगणकांनी दिल्याने या सर्वेक्षणावरच आता प्रश्न उपस्थित हाेत आहे. शिक्षणापासून शहरातील एकही बालक वंचित राहू नये यासाठी २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात केवळ २९ बालके शाळाबाह्य आढळून आली असून एक लाख तीन हजार ३३९ कुटुंबांचे सर्वेक्षण केल्यानंतर २९ बालके आढळल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रमुख रस्ते व चौकांमध्ये भीक मागणाऱ्या लहान मुलांची संख्या अधिक असून त्यांचा शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये का समावेश केला नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, त्यांचे आई-वडील त्यांना शाळेत पाठवत नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम केला असून त्यात एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही असे दंडक घातला आहे. जर काही ना कारणास्तव किंवा पालक रोजगारासाठी स्थलांतर करत असेल तर अशा मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
जेणेकरून ते कोठेही गेले तरी या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शक्य आहे. दरम्यान, कामगार तसेच कर्मचाऱ्यांच्या बालकांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी व्यापक स्वरूपात सर्वेक्षण घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना परिपत्रकाद्वारे केली आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले.
त्यासाठी १०७५ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली होती. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत वय वर्षे ३ ते १८ या वयोगटांतील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २९ बालके स्थलांतरित होऊन आली असून नऊ बालके शहरातून अन्यत्र स्थलांतरित झाली असल्याची माहिती प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिली आहे. गेल्या वर्षी ४९ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. यंदा त्यात घट झाल्याचा दावा विभागाने केला आहे.
या ठिकाणी केले गेले सर्वेक्षण
ही मोहीम शहरात विविध ठिकाणी राबविण्यात आली. त्यातही वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, शेतमजूर, मजूर रहात असलेला परिसर, औद्योगिक वसाहती तसेच अशा उद्योगांच्या ठिकाणी की जेथे स्थलांतरित मजूर व कामगार येतात अशा ठिकाणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.
स्थलांतरितांना प्रोत्साहन भत्ता
स्थलांतरित मुलांना शिक्षण हमी कार्ड देऊन त्यांचे शंभर टक्के प्रवेश दिले आहे. सर्वांना नजीकच्या खासगी तसेच पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत. त्याची उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी प्रोत्साहन भत्ता, उपस्थिती भत्ता देण्यात यावा तसेच लेखन साहित्यासाठी स्वतंत्र तरतूद केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.