आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:सिव्हिलचा भोंगळ कारभार, निगेटिव्ह रुग्णावर पाॅझिटिव्हचे उपचार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिव्हिलच्या टेस्टिंग लॅबमध्ये शेकडो अहवाल प्रलंबित

कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना शासनाने संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या नागरिकांची तत्काळ टेस्टिंग करून अहवाल देत त्यांना उपचाराखाली आणण्याचे आदेश दिले असताना सिव्हिल हॉस्पिटलच्या टेस्टिंग लॅबमध्ये मात्र भाेंगळ कारभारामुळे बाधित रुग्ण निगेटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णाला पॉझिटिव्ह दाखवत चक्क कोविड सेंटरमध्ये दखल करून घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भोंगळ कारभारामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील आणखी एक गैरप्रकार उघडकीस आला आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शासनाने कोविड टेस्टिंग लॅब सुरू केली आहे. या लॅबची धुरा कंत्राटी डॉक्टरांकडे आहे. काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शासनाने टेस्ट वाढवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. मात्र, या आदेशाचा सिव्हिल लॅबला विसर पडला आहे. रुग्णाचे स्वॅब घेतल्यानंतर काही वेळात रिपोर्ट येणे अपेक्षित असताना चक्क आठ दिवस हे रिपोर्ट प्रलंबित रहात आहे. या कालावधीत रुग्ण बाहेर इतरांच्या संपर्कात येत असल्याने संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाची दिशाभूल
सिव्हिल हॉस्पिटलच्या लॅबमध्ये रोज तीन ते चार हजार नमुन्यांची तपासणी केली जाते, असा अहवाल जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवला जातो. मात्र प्रत्यक्षात रोज १२०० नमुन्यांची तपासणी केली जाते. यातील देखील निम्मे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निगेटिव्ह असुनही रुग्णाचे नाव पाॅझिटिव्हच्या यादीत
सिव्हिलमध्ये टेस्टिंग केलेल्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, याच रुग्णाचे नाव पॉझिटिव्ह रुग्णांच्या लिस्टमध्ये टाकण्यात येऊन या रुग्णाला थेट पॉझिटिव्ह रुग्णांच्या वार्डमध्ये दाखल करून घेण्यात आले.

तीन दिवसांपासून ३०५९ रिपोर्ट प्रलंबित
सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरोना लॅबमध्ये रोज १६०० ते २ हजार अहवाल तपासणी केली जाते. मात्र तीन दिवसांपासून लॅबमध्ये ३०५९ रिपोर्ट प्रलंबित आहेत. सूचनांचे तंतोतंत पालन सिव्हिलच्या कोरोना लॅबमध्ये शासननिर्देशानुसार कामकाज सुरू आहे. रुग्णांच्या रिपोर्टबाबत काही तक्रारी आहेत. याबाबत लॅबमध्ये कडक निर्बंध लावले जातील लॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. - डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक

अनुभवी अधिकारी बाजूला
तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे, तत्कालीन अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीतही सिव्हिलमधील डॉक्टरांना सोबत घेत कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोनावर नियंत्रण मिळवले. याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत प्रशस्तिपत्र देत सन्मान केला होता. आताही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना याच अनुभवी अधिकाऱ्यांना साइड ट्रॅक केल्याने सिव्हिल सर्जन यांच्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत जाब विचारला आहे.

अहवालात फरक
एका रुग्णाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लॅब टेस्टिंग अहवाल पॉझिटिव्ह आला. कुठलाही संसर्ग नसल्याने त्यांनी खासगी लॅबमध्ये अहवाल तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला.

ग्रामीण भागातील रुग्णांची पिळवणूक
सिव्हिलच्या लॅबमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या बहुतांशी रुग्णांच्या अहवालात ‘व्हायरस न्यूक्लियर नाॅट फाउंड’ असा शेरा येतो. याबाबत लॅब टेक्निशियन्सना सिव्हिल सर्जन यांनी अद्याप विचारणा केली नसल्याने अशाप्रकारे रिपोर्ट येणे अद्याप सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...