आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वच्छ शहर सर्वेक्षण; केंद्राचे पथक नाशकात ; सार्वजनिक स्वच्छतेसह घरगुती कचऱ्याची पाहणी करणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणासाठी केंद्र शासनाचे पथक सोमवारी (दि. ६) संध्याकाळी नाशकात दाखल झाले आहे. पुढील चार दिवसांत घरगुती, व्यावसायिक कचऱ्याची विल्हेवाट, घंटागाडीद्वारे व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणी होणारी स्वच्छता याची पाहणी करणार आहेत. दरम्यान, देशातील पहिल्या दहा शहरांत नाशिकला आणण्यासाठी पालिका आयुक्त रमेश पवार यांनी कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून कंत्राटी ७०० सफाई कर्मचाऱ्यांसह पालिकेच्या नियमित जवळपास १५०० सफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता नागरिकांनीही कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ‘स्वच्छ व सुंदर नाशिक’ अशी ओळख असूनही केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धंतर्गत देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरात निवड होण्याचा मान नाशिकला मिळू शकलेला नाही. २०१९ मध्ये दहा लाख लोकसंख्या असलेल्या देशभरातील पाचशे शहरांमध्ये ६७ वा क्रमांक लागला होता. सन २०२० मध्ये अवघ्या एका गुणाने संधी हुकून देशातील अकरावे स्वच्छ शहर म्हणून नाशिकचे नाव उंचावले होते. पुढील वर्षी देशातील पहिल्या दहा शहरांत नाशिकला येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही अशी परिस्थिती असताना २०२१ मध्ये १७ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ही घसरण होण्यासाठी बांधकाम साहित्य मलबा विल्हेवाटीत आलेले अपयश तसेच नागरिकांचा प्रतिसाद कमी पडल्याचे प्रमुख कारण होते. ही बाब लक्षात घेत आयुक्त पवार यांनी हातात कमी वेळ असूनही पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणादरम्यान आवश्यक उपाय योजण्यासाठी ताकद पणाला लावली होती. या स्पर्धेत सीटिझन फिडबॅक ही महत्त्वाची वर्गवारी असून जवळपास एक लाख नाशिककरांनी केंद्राच्या संकेतस्थळावर जाऊन स्वच्छ शहर स्पर्धेबाबत फिडबॅक नोंदवणे अपेक्षित होते. जास्तीत जास्त फिडबॅक जाण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्त पवार यांनी एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जागृती केली. त्यामुळे जवळपास ४० हजार सीटिझन फिडबॅक नोंदवला गेला. आता दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणासाठी केंद्रांचे पथक नाशकात दाखल झाले आहे. साधारण पाच अधिकारी व कर्मचारी या पथकात असून ते मंगळवारी सकाळपासून शहरातील विविध भागांत जाऊन स्वच्छतेची पाहणी करतील.

काही त्रुटी असल्यास नागरिकांनी कळवावे ^केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेच्या पाहणीसाठी पथक नाशिकमध्ये आले आहे. देशातील पहिल्या दहा शहरांत नंबर येण्यासाठी महापालिका कसोशीने प्रयत्न करीत आहे. सफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहराची स्वच्छता करून घेतली जात आहे. यात कोठे त्रुटी रहात असल्यास नागरिकांनी कळवावे तसेच आवश्यक ते सहकार्य करावे. - रमेश पवार, आयुक्त, महापालिका

नाशिकचे पर्यावरण व हवामान सर्वांनाच हवेहवेसे वाटते. अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकची स्वच्छता ही निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. शहराला अधिकाधिक स्वच्छ ठेवायचे असेल तर आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेमध्ये देशातील पहिल्या दहा शहरांत नाशिकची निवड होणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात नाशिककरांनी ‘दिव्य मराठी’च्या आवाहनालाही प्रतिसाद देताना चांगला आॅनलाइन फिडबॅक दिला. आता केंद्र शासनाचे पथक दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणासाठी नाशिकमध्ये आले आहे. हे पथक घरोघरी होणारा कचरा संकलनासाठी विल्हेवाट कशी लावली जाते याची पाहणी करणार आहे. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आपापल्या पद्धतीने योगदान देतीलच मात्र, प्रत्येक नाशिककरांनी ब्लॅकस्पॉटवर कचरा न टाकता तो घरातील कचरा डस्टबिनमध्ये योग्य पद्धतीने साठवून तो घंटागाडीमध्ये टाकण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बसस्थानक, रेल्वेस्थानक, गोदाकाठ अशा सार्वजनिक ठिकाणीही कोणी कचरा टाकू नये. अशा पद्धतीने कोणी अस्वच्छता करत असेल तर त्यालाही प्रवृत्त करणे गरजेचे आहे. स्वच्छ शहर स्पर्धेत जिंकण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावणे गरजेचे आहे. इतकेच यानिमित्ताने आवाहन.

बातम्या आणखी आहेत...