आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:पिंपळगाव बसवंतचा टोलनाका बंद करा, अन्यथा आंदोलन करू; भाजपचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार दाेन टोल मधील अंतर किमान 60 किलाेमीटर असले पाहीजे. मात्र पिंपळगाव बसवंत व चांदवड येथील टोलचे अंतर केवळ 35 किलाेमीटरचे आहे. तसेच नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून हे अंतर केवळ 20 किलाेमीटर आहे. त्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील टोल नियमबाह्य ठरत असून हा टोल रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवा अन्यथा महामार्ग प्राधिकरणाच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील व भाजप युवामाेर्चाचे उपाध्यक्ष अमाेल पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे.

जिल्ह्यातील जनतेला भेडसावणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्याच्या संदर्भात महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, भाजयुमाेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड, गणेश बोलकर, सीए मनोज तांबे, साहेबराव आव्हाड, माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड, हभप राहुल साळुंके आदींनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी साळुंखे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

नाशिक ते चांदवड 65 किमी चा प्रवास करण्यासाठी पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर 210 रुपये व चांदवड टोल नाक्यावर 165 रुपये असा एकूण 375 रुपये टोल भरावा लागतो. वाहन नोंदणी केली असेल तरी 375 रूपये टोल फक्त 65 किमी साठी भरावे लागतात. ही आकारणी बघता 1 किलाेमीटर अंतरासाठी वाहनधारकांना 5 रूपये 75 पैसे याप्रमाणे टोल भरावा लागताे. याचाच अर्थ समृध्दी महामार्गापेक्षाही ही आकारणी जास्त आहे. समृध्दी महामार्गावर 1 किलाेमीटरसाठी 1 रुपया 75 पैसे याप्रमाणे टोल आकारणी केली जाते. चांदवड येथील शक्तीपीठ असलेले रेणुका माता मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना एक बाजुने 375 रुपये टोल भरावा लागतो. या दाेन्ही ठिकाणी जाण्यासाठी टोल मध्ये कपात करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

रक्कम परत करावी

पिंपळगाव बसवंत टोल नाका कायद्यात बसतच नाही. त्यामुळे या टोल नाक्यावर वाहनधारकांकडून वैयक्तिक व फास्टटॅगच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या वसुल केलेली रक्कम परत करावी. तक्रारीसाठी दिलेला व्हाॅटसअप नंबर बंद ठेवून वाहनधारकांची लुट सुरू असल्याचा आरोप भाजयुमाे उपाध्यक्ष अमाेल पाटील यांनी केला.

सहन करणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या डाेळ्यात धुळफेकीचा प्रयत्न सहन करणार नाही. त्यामुळेच प्रकरणाला वाचा फाेडली असून वेळप्रसंगी जनआंदाेलन उभारू असा इशारा मनपाचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी दिला.