आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुंबई, पुणे तसेच गुजरातपेक्षाही नाशकात सीएनजी महागडाच; सीएनजी भरायला १० मिनिटे, प्रतीक्षा मात्र दाेन तासांची

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबइ, पुणे, गुजरातपेक्षाही महागडा सीएनजी नाशिककरांना खरेदी करावा लागताे आहे. विशेष म्हणजे, १० ते १२ मिनिटांत हे इंधन वाहनात भरले जाते, मात्र त्यासाठी नंबर यायला दाेन-दाेन तास वाहनचालकांना ताटकळत राहावे लागते. २४ तास पुरवठा उपलब्ध असलेल्या विल्हाेळी पंपावर कार आणि व्यावसायिक वाहनांसाठी वेगवेगळी व्यवस्था असली तरी हा वेळ कमी झालेला नाही. याचमुळे सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत, सीएनजी वाहने खरेदी करणाऱ्या वाहनचालकांमध्ये माेठा असंताेष पाहायला मिळत आहे.

देशात वाढते प्रदूषण लक्षात घेत केंद्र आणि राज्य शासनाकडून सीएनजी वाहनांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. त्यास सामान्य जनतेसह वाहतूकदारांनीही चांगला प्रतिसाद देत, जास्त किंमत माेजून सीएनजी वाहने खरेदी केली आहेत. प्रवासी वाहनांसह ट्रान्सपोर्ट व्यावसायासाठी देखील जिल्ह्यात या वाहनांचा वापर वाढला आहे. मात्र सीएनजीचे दर निश्चित नाहीत तसेच पुरेसा पुरवठा हाेत नाही यामुळे व्यावसायिक वाहने असलेले मालक अडचणीत येत आहेत. प्रत्येक शहरात वेगवेगळे दर असल्याने वाहतूक खर्चाचा ताळमेळ बसविणे कठीण हाेणार आहे.

थेट पाइपलाइन केव्हा : कंपनीने घराघरापर्यंत स्वयंपाकाचा गॅस पुरविण्यासाठी कनेक्शन जाऊन पाेहाेचली आहेत, तर ८ पंपांद्वारे वाहनधारकांना सीएनजी उपलब्ध करून दिला जाताे. याकरीता मात्र पुण्याहून वाहनांद्वारे दरराेज सीएनजी आणावा लागताे. कंपनीने नाशिकमध्ये पदार्पण केले तेव्हा पाइपलाइनद्वारे गॅसची उपलब्धता गुजरातमार्गे हाेणार असल्याचे सांगितले हाेते मात्र, ती अद्यापही पूर्ण झालेली नाही, ती केव्हा हाेणार असा प्रश्न उपस्थित हाेऊ लागला आहे.

हजारांवर व्यावसायिक वाहने
शहरात २ हजारांवर व्यावसायिक वाहने सीएनजीवर धावतात. यात छाेटा हत्ती, टाटा ४०७ ते आयशर ट्रक, टाटा १२१५ ट्रक अशी अवजड वाहने तसेच पालिका सिटीलिंक सेवेच्या ५० पेक्षा अधिक बसेसचा यात समावेश आहे.

दाेन तास प्रतीक्षा, दर महागडेच
सीएनजी भरण्यास १२ मिनिटे लागतात. मात्र दाेन तास प्रतीक्षा करावी लागते. सीएनजीचे दर गुजरात राज्यापेक्षा महागडे असून मुबलक पुरवठा व समान दर असावेत, अशी मागणी केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे.
राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक ट्रान्सपाेर्ट असाेसिएशन

वाहतक खर्चामुळे नाशिककरांना सीएनजी महाग : सीएनजी वाहतूक पाइपलाइननेच हाेते. महत्त्वाचे म्हणजे सीएनजी समुद्रातून मिळत असल्याने लगतच्या मुंबई, रत्नागिरी यासारख्या शहरांना थेट पंपांपर्यंत पाइपलाइनने पुरवठा हाेताे. नाशकात मात्र एमएनजीएल ही कंपनी पुण्याहून दरराेज वाहनांद्वारे बाॅटल स्वरूपात रिफिल करून सीएनजी आणते. हा वाहतूक खर्च माेठा असून त्याचा भार वाहनधारकांवर पडताे .

बातम्या आणखी आहेत...