आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नंदिनी नदीतून 1950 किलाे कचऱ्याचे संकलन; नंदिनी नदी स्वच्छता मोहीम

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या वतीने एनसीसी कॅडेट्सच्या मदतीने नंदिनी नदी स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण करण्यात आले. टाकळीराेडवरील समर्थ रामदास स्वामी मठासमाेरील नदीपात्रासमाेर या माेहिमेचे उद‌्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी १९५० किलाे कचरा बाहेर काढण्यात आला तर ५० वृक्षांची लागवडही करण्यात आली.

नाशिक महानगरपालिका आणि ७ महाराष्ट्र बटालियन तसेच ३६५ एनसीसी कॅडेट्स यांच्या सहभागाने नंदिनी नदीची स्वच्छता करण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी येथील स्वामी समर्थ मठ येथे गुरुवारी (दि. २४) स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण अभियानाला सुरुवात करण्यात आली. नाशिक शहर सुंदर, स्वच्छ आणि हरित करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया आणि सर्वांनी मिळून शहरातून वाहणाऱ्या सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊया. नाशिक अजून चांगलं शहर बनवूया, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.

या अभियानात गुरुवारी १९५० किलो कचरा गोळा करण्यात आला. तसेच ५० पेक्षा जास्त वृक्षांचे रोपण करण्यात आले. खा. हेमंत गोडसे यांनी यावेळी मनपाच्या अभियानाचे कौतुक करून युवकांसह नाशिककरांना मोहिमेत सहभागाचे आवाहन केले. केंद्र सरकारच्या पुनितसागर अभियानांतर्गत व ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले.

मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, लेफ्टनंट कर्नल रवी व्यास, सुभेदार सचिन पाटील, सागर पवार, दादा नलावडे, सीएचएम विजय शेवाळे, शहाजी घारगे, तात्या कदम, अरविंद कातकर आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

आता स्वच्छतादूत म्हणून एनसीसी कॅडेट‌्सला दर्जा
शहरातील एनसीसी कॅडेट्स यांची स्वच्छतादूत’ आणि ‘पर्यावरणदूत’ म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी यावेळी घेतला. ‘कुठेही चुकीचे काम होताना दिसून आले, पर्यावरणाला हानी पोहाेचवण्यासारखे काही घडत असल्याचे दिसून आले तर कॅडेट्स थेट मला भेटून माहिती देऊ शकतात.’- डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका

बातम्या आणखी आहेत...