आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविल्या जातील. वाढीव व अन्यायकारक वाटणाऱ्या घरपट्टीसह सर्व ज्वलंत प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिले. येत्या आठ दिवसांत उद्योजकांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक बोलावून निर्णय घेतले जातील, असे पवार यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना स्पष्ट केले.
अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त रमेश पवार यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर पवार बोलत होते. उद्योजक हा महापालिकेच्या उत्पनाचा खरा कणा असला तरी तुलनेने त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधा अपुऱ्या आहेत. एमआयडीसीने सातपूर औद्योगिक वसाहतीत अग्निशमन केंद्र कार्यान्वित करून ते महानगरपालिकेस चालविण्यासाठी दिले आहे. ते आजतागायत चालू आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीने अंबड औद्योगिक वसाहतीतही असे उभारून ते कार्यान्वित केले.
मात्र एमआयडीसीने अंबड औद्योगिक वसाहतीला स्वतंत्र फायर सेस आकारला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीला दोन वेगवेगळ्या मंडळांना म्हणजे महापालिका आणि एमआयडीसीला कर भरावा लागतो. ही बाब गंभीर असून त्यात आपण लक्ष घालावे, उद्योजकांवर अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही, असे पांचाळ यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. कोविडमुळे उद्योजकांचे कंबरडे आधीच मोडले असतानाही नाशिकच्या उद्योजकांवर वाणिज्य दराने घरपट्टी भरण्याची वेळ आली आहे. यामुळे उद्योजकांना चारपट घरपट्टी भरावी लागते हे एकप्रकारे अन्यायकारक आहे. शासनाच्या धोरणानुसार उद्योजकांना झळ बसणार नाही अशा पद्धतीने घरपट्टी निश्चित करावी, अशी कळकळीची विनंतीसुद्धा पांचाळ यांनी निवेदनात केली आहे चर्चेत आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, खजिनदार राजेंद्र कोठावदे, सचिव योगिता आहेर आदींनीही भाग घेतला.
घंटागाड्यांची संख्या अपूर्णच
औद्योगिक वसाहतीतील घंटागाड्यांची संख्या वाढवून कचऱ्याचा निपटारा दैनंदिन कसा होईल यादृष्टीने उपाययोजना करावी. औद्योगिक वसाहत परिसरात पाण्याचा मुबलक पुरवठा करावा, असेही निवेदनात नमूद केले आहे. घंटागाड्यांची संख्या कमी असल्याने कचरा वेळेवर उचलला जात नसल्याची तक्रार या चर्चेदरम्यान करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.