आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविभागीय अधिकारी कार्यालयात थांबत नसल्याने सातपूरमध्ये अंदाधुंद कारभार सुरू असून परिसरात समस्यांचा डोंगर उभा राहिला असल्याची तक्रार भाजपच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त रमेश पवार यांनी सोमवारी सकाळी ७ वाजताच सातपूरला भेट देऊन विविध ठिकाणांची पाहणी केली.
पालिकेचे माजी सभागृहनेता दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने विभागीय अधिकाऱ्यांची तक्रार करतानाच सातपूर भागातील समस्यांबाबत आयुक्तांशी चर्चा केली होती. धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा असताना नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट निर्माण झाले आहेत. अतिक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनधिकृत फलकांमुळे चौकांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबतची तक्रार करण्यास विभागीय कार्यालयात गेल्यानंतर विभागीय अधिकारी कार्यालयात हजर नसतात. त्यामुळे सातपूर भागाला दिवसेंदिवस समस्यांचा विळखा बसत असल्याची तक्रार माजी सभागृहनेता दिनकर पाटील, माधुरी बोलकर, प्रा. डॉ. वर्षा भालेराव, माजी सभापती रवींद्र धिवरे, गणेश बोलकर, अॅड. महेंद्र शिंदे आदींनी आयुक्तांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी साेमवारी सकाळी सातपूर गावातील नंदिनी नदी, ग्रामविकास मंडळ कार्यालय अशा ठिकठिकाणच्या ब्लॅक स्पॉटची पाहणी केली.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईच्या पार्किंग स्थळाची पाहणी करून कार्बननाका परिसरातील अतिक्रमणासह समस्यांची पाहणी केली. त्यानंतर चुंचाळे परिसरातील घरकुल योजनेची पाहणी केली. आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून आता विभागीय अधिकारी नेमकी काेणती भूमिका घेतात याकडे सातपूरकरांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात मनपाचे कार्यकारी अभियंता नितीन वंजारी, विभागीय अधिकारी नितीन नेर, विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे, तानाजी निगळ आदींचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.