आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन बस सुरू झाली की प्रति दिन किमान दोनशे किलोमीटर याप्रमाणे प्रवासी मिळो ना मिळो सिटीलिंककडून ठेकेदाराला भाडे सुरू होणार असल्याच्या विचित्र कराराचा फायदा घेत गरज नसताना नवीन बसेस वाढवण्याच्या उद्योगाला अखेर आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी ब्रेक लावला आहे. त्यामुळे आता ४३ नवीन बसेसचा मार्ग बंद झाला आहे. एवढेच नव्हे तर आयुक्त पवार यांनी २० रुपये प्रति किमी उत्पन्न असलेल्या मार्गावरील बसेस बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग कोणते याचे सर्वेक्षण करण्याबरोबर नाशिक शहरालगत ग्रामीण भागांमध्ये फायद्याचे मार्ग कोणते हेही शोधण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून सिटीलिंक ही बससेवा सुरू करण्यात आली असून पहिल्या दिवसापासून बससेवा तोट्यात आहे. ८ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत जवळपास तीस कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एकीकडे तोटा वाढत असताना दुसरीकडे शहरांमध्ये नवीन बसेस वाढवण्याचा सपाटा सुरू होता. ८ जुलै २०२१ रोजी पहिल्या टप्यात ५० बसेस सुरू केल्यानंतर सद्यस्थितीत ५० मार्गावर २०५ बसेस धावत आहेत. तर दैनंदिन प्रवाशांची संख्याही ६५ हजारांवर पोहोचली आहे. मात्र, अद्यापही अनेक मार्गावरील बसेस कमी क्षमतेने धावत असल्याने तोटा वाढत आहे.
मुळात, बसेसची संख्या वाढवण्यापूर्वी ज्या फेऱ्या तोट्यात आहे, त्यांचा अभ्यास करून तेथील बसेस ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक आहे तेथे वळवण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी दिले होते. मात्र, असे केले तर ठेकेदाराच्या बसेस पूर्ण क्षमतेने सुरू होणार नसल्याचे लक्षात घेत नवीन बसेस वाढवण्याचे सत्र सुरूच राहिले. याचा परिणाम म्हणून सद्यस्थितीमध्ये प्रति किमी सरासरी ७७ रुपये ठेकेदाराला दिले जात असताना त्या बदल्यात केवळ ३५ ते ३७ रुपये प्रति किमी वसूल होत आहे. त्यामुळे पालिकेचा तोटा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे.
त्यात इंधनाचे दर वाढल्यामुळे किमान दरमहा ५ कोटी रुपये पालिकेला बससेवेपोटी द्यावे लागत आहे. हे लक्षात घेता आयुक्त पवार यांनी मंगळवारी सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून २० रुपये प्रति किमी इतके उत्पन्न असलेले मार्ग कोणते याचा अभ्यास करून येथील बसेस कमी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सद्यस्थितीत सुरू २०५ बसेस व्यतिरिक्त एकही नवीन बस जोपर्यंत आवश्यकता भासत नाही, तोपर्यंत सुरू करू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे जवळपास पन्नास नवीन बसेस अकारण सुरू करण्याचा डाव उधळला गेला आहे.
जाहिराती शुल्कापोटी ठेंगा; ५० टक्केपर्यंत उत्पन्न मिळणार
८ जुलै २०२१ पासून बससेवा सुरू झाल्यानंतर पालिकेला मोठ्या प्रमाणात तोटा होत असून हा तोटा भरून काढण्यासाठी बसेसवर जाहिराती लावण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र या योजनेमध्ये महापालिकेला ठेंगा दाखवण्यात आला असून एकूण उत्पन्नाच्या केवळ पाच टक्के फायदा महापालिकेला देण्यासारखी विचित्र अट टाकली गेल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात आल्यावर आयुक्त पवार यांनी या विषयाचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर किमान पाच असा उल्लेख आढळल्यामुळे आता जास्तीत जास्त ५० टक्के फायदा महापालिकेचा व ५० टक्के फायदा ठेकेदाराचा या अटीवर जाहिरात लावण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे.
‘कसारा’सारखे मार्ग शोधण्याचे आदेश
उत्पन्न वाढीसाठी यापूर्वीच नाशिक शहरालगत असलेल्या ओझर, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर ,चांदोरी, सायखेडा या भागांमध्ये सिटीलिंक बस सेवेचा विस्तार केला आहे. आता कसारासारख्या मुंबई लोकल टच असलेल्या मार्गावर देखील बस सुरू करता येईल का या दृष्टीने चाचपणी करण्याच्या सूचना आयुक्त पवार यांनी केल्या आहे.
र्तास पंचेचाळीस बसेस वाढवण्याची गरज नाहीत
बससेवेचा तोटा अधिक असून तो कमी करण्यासाठी आवश्यकता भासेल, तितक्या नवीन बसेस सुरू केल्या जाणार आहेत. तूर्तास ४५ नवीन बसेसची गरज नाही. २०५ बसेसमध्ये शहरांमधील फेऱ्या करणे शक्य आहे. २० रुपये प्रति किमी उत्पन्न असलेल्या मार्गांवरील बसेस कमी करण्याच्या सूचना दिल्या असून जाहिराती पोटी ५० टक्के उत्पन्न मिळेल अशा दृष्टिकोनातून नियोजन करण्याबाबत सूचना दिली आहे.
- रमेश पवार, आयुक्त तथा प्रशासक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.