आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समिती नावालाच:समितीच्या पालकांची एकट्याची ‘स्मरणिका’; साळवेकर स्मरणिका तयार करत असल्याचे जातेगावकरांकडून स्पष्ट

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचा घोळ अद्यापही संपता संपेना असाच आहे. संमेलनाचा हिशेब मांडला तरीही स्मरणिका अजूनही तयार होतच आहे. विशेष म्हणजे या समितीच्या सदस्यांना स्मरणिकेबद्दल काहीच माहिती नसून स्मरणिका समितीचे पालक दिलीप साळवेकर हे स्मरणिकेवर काम करत असल्याचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे मग स्मरणिका समिती केलीच कशाला असा प्रश्न समिती सदस्यांना पडला आहे. साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचा खेळ अद्यापही सुरू आहे. जी स्मरणिका संमेलनाला येणाऱ्या साहित्य रसिकांसाठी असते ती आता पुढचे साहित्य संमेलन महिन्यावर आले असतानाही प्रकाशीत झाली नसल्याने भोंगळ कारभारावर आता टीका होऊ लागली आहे. मुळ उत्तम मजकूर असलेली स्मरणिका तयार असूनही वेळेवर केवळ ११ प्रती छापण्यात आल्या. त्याचे प्रकाशन साहित्य संमेलनात करण्यात आले. मात्र ती साहित्य रसिकांसाठी उपलब्ध करण्यात आली नाही.

का तर संमेलनातील कार्यक्रम, छायाचित्रे असं सगळं घेऊन एक मोठी स्मरणिका स्मरणिका नव्हे तर खंडच तयार करू आणि तोच वाटू असे सांगण्यात येऊन त्यावेळी केवळ ११ प्रती प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र आता संमेलन होऊन ३ महिने उलटले तरी स्मरणिकेचे काम सुरूच असल्याचे निमंत्रक जातेगावकर यांनी सांगितले. मूळ स्मरणिकेला जोडण्यात येणाऱ्या नव्या खंडात स्मरणिका समितीचे पालक दिलीप साळवेकर यांनी एक दीर्घ लेख लिहिल्याचे कळते.

तर संमेलनातील परिसंवाद, काव्यसंमेलन आणि इतर काही कार्यक्रमांचे छायाचित्र हे देखील त्यात घेण्यात येणार असून त्याची निवडही साळवेकर यांनी एकट्यानेच केल्याचे सांगण्यात आले. जर स्मरणिकेचा हा नवा भाग पालकांना एकट्यानेच करायचा होता तर मग स्मरणिका समिती तयारच कशासाठी केली असा प्रश्न समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.

संमेलनाचा हिशेब मांडण्याच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता ते सगळं काम समितीचे पालक दिलीप साळवेकर करत आहेत असे खुद्द संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितल्याने हे काम समितीला सोडून एकटे साळवेकरच करत असल्याचे स्पष्टच होत आहे. ही स्मरणिका येत्या १५ दिवसांत येऊ शकते असा अंदाजही जातेगावकर यांनी दिला आहे. मात्र आता स्मरणिकेच्या प्रती छापून प्रिंटींगवरील ताे खर्च वाया जाणार नाही का? असा सवालही उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...