आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी पाठपुरावा:पेठराेडचे काँक्रिटीकरण; स्मार्ट सिटी देणार निधी

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-गुजरात महामार्गावरील महापालिका हद्दीतील राऊ हाॅटेल ते तवली फाटा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे साेमवारी (दि. २१)स्थानिक नागरिकांनी रास्ता राेकाेचा प्रयत्न केल्यानंतर लाेकप्रतिनिधी व प्रशासन खडबडून जागे झाले आहे. साडेसहा किलोमीटरपैकी चार किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटीच्या निधीतून करण्यास महासभेने मंजुरी दिल्यानंतर त्यासंदर्भातील ठराव बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे.

लेखाधिकाऱ्यांनी महासभेच्या ठरावाची तांत्रिक बाजू तपासल्यानंतर स्मार्ट सिटीच्या निधीतून सदरचा रस्ता तयार करण्यास समंती दर्शवली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने सदरचा ठराव आता स्मार्ट सिटीकडे अंमलबजावणीसाठी पाठवला असून स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे. सन २०१४ मध्ये सिंहस्थापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे या रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. कुंभमेळ्यापूर्वीच या रस्त्यावर खड्डे पडले असून, येथून वाहनधारकांना वाहने काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

स्थानिकांनी या रस्त्याच्या मागणीसाठी दोन दिवसापूर्वीच आंदोलन केले होते. माजी नगरसेवक अरुण पवार यांनी या रस्त्यासाठी पंचवटीतील स्टेडियमचे काम थांबवून तो निधी रस्त्यासाठी वर्ग करण्याची मागणी केली होती. या रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी ७१ कोटींची आवश्यकता आहे. पालिकेकडे निधी उपलब्धता नसल्याने काम स्मार्ट सिटीच्या निधीतून करण्याची शिफारस आ. अॅड. राहुल ढिकले यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार ९ नोव्हेंबरला झालेल्या महासभेत सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

नागरिकांच्या आंदोलनानंतर त्यांचा रोष कमी करण्यासाठी तसेच या ठरावाची अंमलबजवणी करण्यासाठी सदरचा ठराव स्मार्ट सिटी कंपनीकडे रवाना करण्यात आला आहे. अॅड. ढिकले यांनी या रस्त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालिकेने ७१ कोटींचा क्रॉक्रिटीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. पालिकेपाठाेपाठ जिल्हा नियोजन समितीतून निधीची मागणी केली. परंतु, नियोजन समितीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे हा स्मार्ट सिटीच्या शिल्लक निधीतून करण्याचा प्रस्ताव ढिकलेंनी आयुक्तांना दिला होता. त्यानुसार आता हा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता काॅंकीट्ीकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे.

शासनाकडेही मागणी
सिंहस्थापूर्वीच पेठरोडचे काँक्रिटीकरण आवश्यक आहे. पालिकेकडे निधी नसल्यामुळे महासभेच्या ठरावानंतर आता स्मार्ट सिटीच्या निधीतून हा रस्ता तातडीने होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. - अॅड. राहुल ढिकले, आमदार

बातम्या आणखी आहेत...