आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:संजय पुनामियाच्या मोबाइल फोनमध्ये आढळली सीबीआयची गोपनीय कागदपत्रे, खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा साथीदार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यासह खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी संजय पुनामियाच्या मोबाइलमध्ये सीबीआयच्या पोलिस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलिस महासंचालकांना पाठवलेली गोपनीय कागदपत्रे सापडली आहेत. या प्रकरणी मरीन लाइन्स पोलिस ठाण्यात पुनामियाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरुद्धचा हा १२ वा गुन्हा असून मुंबई हायकोर्टाने बुधवारी त्याचा अंतरिम आदेश रद्द केला.

३ मे २०२१ रोजी संशयित आरोपी संजय पुनामियाने आपला मुलगा सनी याला पानांची पीडीएफ फाइल पाठवली. त्यात नवी दिल्लीतील सीबीआयच्या पोलिस अधीक्षकांनी महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग आणि पोलिस महासंचालकांना पाठवलेली गोपनीय कागदपत्रे आहेत. यावर “गोपनीय’ असा शेरा असल्याने तसेच माहिती अधिकारात ती मिळवल्याचे साक्षांकन नाही. त्यामुळे ही कागदपत्रे लबाडीने, संगनमताने व शासनाची फसवणूक करून मिळवल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय काही मोबाइल क्रमांकांचा सीडीआर पुनामियाने अवैध पद्धतीने मिळवल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे.

अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द
ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुनामियाने हायकोर्टातून अंतरिम आदेश मिळवला होता. मात्र, बुधवारी न्या. नितीन सांबरेंनी त्याचा वकील रिझ‌ान मर्चंटला फटकारून “हे चालणार नाही, कोर्ट अशा पद्धतीने चालत नाही, पुन्हा असे झाले तर कोर्टाचा अवमान समजला जाईल’ अशी ताकीद दिली. कोर्टाने खटल्याची सुनावणी घेण्यास नकार देत अंतरिम आदेश रद्द केला.

बातम्या आणखी आहेत...