आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवक काँग्रेसचे नेते मानस पगार यांचे निधन:मतमोजणीसाठी नाशिकमध्ये येत असतानाच अपघात, सत्यजित तांबेंचे जवळचे सहकारी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मानस पगार आपल्या काही सहकाऱ्यांसह नाशिकमध्ये जात असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

बुधवारी रात्री अपघात झाल्यानंतर मानस पगार यांना तातडीने नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात मानस पगार यांचे काही सहकारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बुधवारी रात्री उशिरा नाशिक-मुंबई महामार्गावरील कन्नमवार पुलाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की यात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कारची पुढील बाजुचा पूर्णपणे चुराडा झाल्याने मानस पगार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सत्यजित तांबेंचे जवळचे सहकारी

मानस पगार हे काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. आज नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकालही लागणार आहे. त्याच दिवशी ही दु:खद बातमी येऊन धडकल्याने धक्का बसल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे

मन सुन्न करणारी बातमी

ट्विटमध्ये सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे.

आज मुळगावी अंत्यसंस्कार
राजकारणातील तरुण चेहरा म्हणून मानस पगार यांना ओळखले जात होते. मानस पगार हे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय तरुण नेते होते. अचानक झालेल्या अपघातामुळे पगार यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मानस पगार यांच्या निधनामुळे एका उमद्या आणि तरुण नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. मानस पगार यांच्या पार्थिवावर आज पिंपळगाव बसवंत या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या आंदोलनाने वेधले होते लक्ष

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावेळी मानस पगार यांनी थेट रावसाहेब दानवे यांच्या घरासमोरच आक्रमक आंदोलन करुन अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. मानस पगार यांनी रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर उपोषण केले होते. त्यावेळी मानस पगार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...