आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष ठाकूर यांचा पदाचा राजीनामा; गटबाजी पुन्हा उघड

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व जिल्हा काॅंग्रेस पक्षातील गटबाजी दोनच दिवसांपूर्वी जिल्हा निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या तालुका अध्यक्ष व ब्लाॅक अध्यक्ष निवडीच्या वेळी आजी-माजी पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने उघडकीस आलेली असताना त्याची पक्षाकडून दखल घेतली जात नसल्याने निष्ठावंत असलेल्या शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी राजीनामा दिला आहे.

ऐन महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर व निष्ठावंतांना डावलले जात असल्याने त्यांनी व्यथित होवून राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. ठाकूर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विलास आैताडे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. या पत्रात सेवादलाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठी गांधी टोपी ३ बाय ५० फूट व गांधी चष्म्याची प्रतिकृती ७ बाय ९ फूट हे बनवण्यात आल्याचे सांगत त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला झाली आहे. या कामाची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी ऑफ लंडन यांनी मला डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे. अशा पद्धतीने शहर काँग्रेस सेवादलाचे काम फक्त शहरापुरते न ठेवता ते जगाच्या पातळीवर नेण्याचे काम केले.

अनेक आंदोलनांच्या माध्यमातून माेठ्या संख्येने पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. समाज कंटकांकडून माझ्यावर दोनदा हल्लेही झाले आहेत. जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. तरीही पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून एन. एस. यु. आय. संघटनेपासून युवक काँग्रेस आणि सेवादलाच्या अध्यक्षपदावर काम करत होतो. दुसऱ्याही पदाधिकाऱ्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी म्हणून राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.

शहराध्यक्षपदासाठी होते इच्छुक
वसंत ठाकूर हे शहराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. गेल्या पाच वर्षांत कॉग्रेसकडून ज्या मोजक्या पदाधिकाऱ्यांकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलने करण्यात आली, त्यात प्रत्येक अांदोलनात ठाकूर अग्रेसर होते. मात्र, दोनच दिवसांपूर्वी निरीक्षकांच्या समोर शहराध्यक्ष व ब्लॉक अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखतीवेळी ते अनुपस्थित होते. दरम्यान, ठाकूर यांच्याबरोबरच अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी बैठकीस अनुपस्थित होते. त्याचवेळी उपस्थित राजेंद्र बागूल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षात लोकशाही प्रक्रियेने कुठलेही कामकाज होत नसून केवळ कागदोपत्रीच काम दाखविले जात असल्याचा उघडपणे आराेप केला होता. या आराेपांना ठाकूर यांनीही समर्थन दिले होते.

बातम्या आणखी आहेत...