आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मांतर प्रकरण:नाशिकमधील संशयित उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात, दिल्लीत चौकशी

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील कथित धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसने नाशकातून अटक केलेला संशयित कुणाल चौधरी ऊर्फ अतिफला चौकशीसाठी थेट दिल्लीत नेण्यात आले आहे. एटीएसने रविवारी रात्री संशयिताला खोले मळा परिसरातील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले होते. मुंबई येथे सोमवारी सकाळी महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथकाकडे नोंद करत त्यास दिल्ली येथे नेण्यात आले. एटीएसने मोहम्मद इद्रिस, मोहम्मद सलीम यांना अटक केल्यानंतर नाशिक येथील संशयिताचे नाव निष्पन्न झाले.

संशयित नाशिकरोड येथे एका धार्मिकस्थळाबाहेर असलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या गाळ्यात आयुर्वेदिक अौषधांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. संशयिताचे कुटुंबीय आनंदनगर भागात एका हॉस्पिटलमागे वास्तव्यास असून पथकाने त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली. या रॅकेटमध्ये आतापर्यंत चार ते पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. संशयित कुणाल ऊर्फ अतिफने जर्मनीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर तो भारतात परतला. देशात मेडिकल पदवी घेतलेल्या उमेदवारास एम.सी.ए. परीक्षा द्यावी लागते. त्यात तो नापास झाला होता. दोन वर्षांपासून तो मौलाना कलीम सिद्दिकीच्या संपर्कात होता.

संशयिताच्या कुटुंबीयांसह वडिलांची कसून चौकशी
कुणाल उर्फ अतिफच्या कुटुंबियांची स्थानिक पोलिसांनी घरी जाऊन सखोल चौकशी केली तसेच त्याच्या वडीलांची सोमवारी सकाळी उपनगर पोलिस ठाण्यात नेऊन बंद दाराआड दीड ते दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. पोलिस उपायुक्त विजय खरात आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी सर्व चौकशी केली. याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. माझा मुलगा तर ८ सप्टेंबरपासून दिल्लीला परीक्षेसाठी गेला आहे : डाॅक्टरकीच्या परवान्यासाठी एफएमजीईची परीक्षा बंधनकारक असते. त्यासाठी कुणाल उर्फ अतिफ ८ सप्टेंबरला दिल्लीला गेला. त्यापूर्वीही तसा तो दिल्लीला जायचा. त्याचा फोन खराब झाला होता. १७ सप्टेंबरपासून त्याचा फोनच बंद असल्याने त्याच्याशी बोलणे झाले नाही. त्यामुळे माझ्या मुलाला एटीएसने घरी येऊन अटक केली नसल्याचा दावा कुणालच्या वडीलांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना केला.

या रॅकेटमध्ये आतापर्यंत चार ते पाच संशयितांना अटक
दिल्लीकडे सकाळी रवाना
संशयिताला घेऊन पथक सकाळी १० वाजता मुंबईकडे रवाना झाले. दुपारी महाराष्ट्र एटीएस कार्यालयात संशयिताची चौकशी केल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वडील सेवानिवृत्त लष्करी हवालदार
कुणालचे वडील लष्करातून हवालदार पदावरून निवृत्त झाले आहेत. लहान भाऊ इंजिनिअर आहे. आई गृहिणी आहे. सध्या त्याचे वडील नाशिकरोडमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडे व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत.

प्रेमविवाह केल्याची चर्चा
कुणालने रशियामध्ये परदेशातील मुलीसाबोत प्रेमविवाह केल्याची चर्चा आहे. तो कोणामध्ये जास्त मिसळत नव्हता. शांत स्वभावाचा तसेच राहणीमान उच्च दर्जाचे होते.रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान तो फोनवर बोलत असायचा अशीही चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...