आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीचा झरा:इसमाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची अफवा, मृतदेह आणण्यास विरोध,कार्यकर्त्यांनी केला पुण्यात दफनविधी, मुलींना तलाठ्याचा आसरा

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
दफनविधी करताना सामाजिक कार्यकर्ते - Divya Marathi
दफनविधी करताना सामाजिक कार्यकर्ते
  • इसमाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची अफवा, मृतदेह आणण्यास विरोध,कार्यकर्त्यांनी केला पुण्यात दफनविधी, मुलींना तलाठ्याचा आसरा

माणसाला माणसापासून दूर लोटणाऱ्या आणि धर्मांमधील भेद तीव्र करणाऱ्या कोरोनाच्या संशयकल्लोळात पुण्यातील एका घटनेनं माणुसकीचा पाझर शिल्लक असल्याची प्रचिती दिली. पित्याची तब्येत अचानक बिघडल्याने केडगावच्या दोन मुलींनी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. तिथे पित्याचा मृत्यू झाला; परंतु कोरोनाच्या अफवेमुळे गावकऱ्यांनी मृतदेह घेण्यास विरोध दर्शवला. अनोळखी शहरात दोन्ही किशोरवयीन मुली गांगरल्या. अशा वेळी सामाजिक मंचाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात दफनविधी केला तर गावच्या तलाठ्यांनी त्या दोन निराधार मुलींना आपल्या घरात निवारा देऊन दुसऱ्या दिवशी सुखरूप घरी पोहोचवले.

ही घटना आहे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुणे शहरातील. शहरापासून साठ किलोमीटरवरील केडगाव येथील रहीम अब्दुल शेख यांची प्रकृती बिघडली होती. लॉकडाऊनमुळे ना उपचार करता येत होते ना पुण्यास नेता येत होते. अखेरीस शेवटी एका सामाजिक कार्यकर्त्याने रुग्णावाहिका करून त्यांना पुण्यास ससून रुग्णालयात पाठविले. त्यांच्यासोबत त्यांच्या मुली रुखसाना (१३) आणि तनुजा (१५) या दोघी होत्या. सोमवारी त्यांच्या पित्याचे निधन झाले आणि ते कोरोनामुळे गेल्याची अफवा गावात पसरली. त्यांनी मृतदेह गावात अाणण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे गांगरलेल्या मुलींसमोर मृतदेहाचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. अखेरीस केडगावचे तलाठी सचिन काळे आणि मूलनिवासी मुस्लिम मंचाचे कार्यकर्ते अंजुम इनामदार मदतीला पुढे आले. शेख यांच्या पत्नीची परवानगी घेऊन मंचाच्या कार्यकर्त्यांनीच पुण्यातील रहमतबाग कब्रस्तानात त्यांचा दफनविधी केला. त्यानंतर तलाठी सचिन काळे यांनी मुलींना कोथरूडच्या आपल्या राहत्या घरी मुक्कामास ठेवून दुसऱ्या दिवशी केडगावला पोहोचविले.

कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेह स्वीकारण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्यावर मंचाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा दफनविधी करणे आणि नातलगांपासूनही लोक दूर पळण्याच्या काळात माणुसकीच्या कर्तव्यातून तलाठी काळे यांनी मुलींना आपल्या घरी मुक्कामाला ठेवणे, त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविणे ही घटना सध्याच्या काळवंडलेल्या वातावरणात आशेचा किरण ठरली आहे.

माणूस म्हणून कर्तव्य मोठे ठरते

खरं तर कोरोनाच्या संकटात लोकांनी लॉकडाऊनसारखे जे नियम पाळायचे ते पाळले जात नाहीत, उलट अफवा आणि विनाकारण भीती यामुळे राईचा पर्वत केला जात आहे. रहीम शेख यांचा मृत्यू किडनी फेल झाल्यामुळे झाल्याचा रिपोर्ट असतानाही विनाकारण ही अफवा पसरली आणि परिस्थिती कठीण बनली होती. सरकारी कर्मचारी यासोबतच माणूस म्हणूनही अशा वेळी आपले कर्तव्य मोठे ठरते. सचिन काळे, तलाठी, केडगाव 

बातम्या आणखी आहेत...