आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगावमधून आलेल्या ७० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचाराच्या नावाखाली वाढीव बिल मिळेपर्यंत वाेक्हार्ट हाॅस्पिटलने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या तक्रारीनंतर उघडकीस अाणला. विशेष रुग्णालय दाद देत नसल्याचे बघून संबधित वृद्धाने थेट जळगाव कनेक्शन वापरून माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी शहाणे यांना रुग्णालयात पाठवून वृद्धाची सुटका करून घेतली.
शुक्रवारी पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे माजी मंत्री महाजन यांनी दूरध्वनीद्वारे तक्रार केली. पाठाेपाठ याच तक्रारीचा माग घेत भाजप नगरसेवक शहाणे यांनी अायुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य अाेळखून अतिरिक्त अायुक्त सुरेश खाडे व अधिकाऱ्यांचे पथक रुग्णालयात धडकले. त्यात शहाणे यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर त्यांनी संबंधित वृद्धाची तातडीने सुटका करून घेतली.
पैसे न भरल्यामुळे डांबले, औषधीही काढून घेतली
जळगावला गणेश काॅलनीत मी राहतो. ९ मार्चला मी कोरोनाबाधित झालो. सात दिवस खासगी डाॅक्टराच्या सल्ल्यानुसार जळगाव येथे विलगीकरणातून राहून उपचार घेतले. त्यानंतर पुढील पाच दिवस महाबळ काॅलनी येथील संभाजीराजे सभागृहात उपचार घेतले. त्यानंतर एचआरसीटी स्कॅन काढल्यानंतर स्काेअर ९ इतका आल्यावर २४ मार्चला मुलाकडे नाशिकला आलो. काही खासगी रुग्णालयात गेलाे तर बेड नव्हते. वाेक्हार्टला २५ मार्चला विमा किती रुपयांचा असे विचारल्यानंतर पाच लाखांचा असल्याचे सांगितले. पन्नास हजार रुपये अनामत रक्कम भरण्याच्या अटीवर बेड मिळाला. त्यानंतर जनरल वॉर्डातील ऑक्सिजन बेडवर तेरा दिवस उपचार घेतले. ६ एप्रिलला आणखी १ लाख ३५ हजार भरा, अशी विचारणा केल्यानंतर मी ते कशासाठी? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर त्यांनी तुमच्यावर अजून उपचार करायचे असल्याचे सांगितले. मी ठणठणीत असून पहिले साडेपाच लाखांच्या बिलाचा हिशेब द्या, असे सांगितल्यावर संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाने प्रथम पावणेदोन लाख रुपये भरा, यानंतर हिशेब देतो, असे सांगितले. त्यानंतर तीन दिवस हॉस्पिटलने माझ्यावरील सर्व उपचार थांबवले. तसेच माझ्याकडील औषधेही काढून घेतली. याबाबत मी आयुक्त खाडे यांच्याकडे तक्रार केली. सध्या मी धोका नको म्हणून घरी ऑक्सिजन सिलिंडर आणून उपचार घेत आहे. - उल्हास काेल्हे, तक्रारदार कोरोनाबाधित रुग्ण
वाेक्हार्ट हाॅस्पिटलवर कारवाई करणार
गेल्या चार दिवसांपासून संबंधित हॉस्पिटलला वारंवार सेंट्रल बेड रिझर्व्हेशन सिस्टिमची माहिती देण्यासाठी सांगितले जात असून त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच या हॉस्पिटलचा संबंधित क्रमांकदेखील उचलला जात नसल्यामुळे आता त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच या रुग्णालयावर लक्ष ठेवण्यात येईल -सुरेश खाडे, अतिरिक्त आयुक्त
रुग्णांची अडवणूक करणे गंभीर
बऱ्या झालेल्या रुग्णांना अशा पद्धतीने हॉस्पिटलने अडवून धरणे चुकीचे असून भरलेल्या पैशाचा हिशेब रुग्णाला देणे गरजेचे आहे. शासनानेदेखील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेची दखल घेऊन सुधारणा केल्या पाहिजे. जळगाव असो, नाशिक असो की संपूर्ण महाराष्ट्र... भाजप तत्काळ जनसामान्यांना न्याय देणारच. - गिरीश महाजन, माजी पालकमंत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.