आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लस सुरक्षितच:वस्तू चिकटण्याचा दावा फाेल, पालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून ज्येष्ठ नागरिकाची तपासणी, अंनिसचेही सत्यशाेधन

सिडकोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना प्रतिबंधक लस घेतल्याने हाताला लाेखंडी वस्तू चिकटत असल्याचा दावा अखेर फाेल ठरला आहे. पालिकेच्या वैद्यकीय पथकाने सिडकोतील अरविंद सोनार (७१) यांची तपासणी केल्यानंतर ही बाब स्पष्ट केली व लस सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. काेराेनाची लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण झाल्याने लोखंडाच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा साेनार यांनी बुधवारी केल्याने गुरुवारी पालिकेच्या वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी करीत लस घेतल्याने हा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले.

सोनार यांच्या हाताला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा प्रकार समोर आला होता. हा प्रकार कोरोना लसीचा दुसरा डाेस घेतल्यानंतर घडला. ही बाब त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आले. याबाबत नक्की हा प्रकार काय आहे? हे स्पष्ट होण्यासाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. कोरोनाची लस घेतल्यानंतर मला तिचा कोणताही त्रास झाला नाही व आजही होत नाही ही लस सर्वांनी घ्यावी, असे आवाहन सोनार यांनी केले आहे. डॉ. अजिता साळुंके, नवीन नाशिक विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन बाजी, डॉ. नृत्या चव्हाण यांच्या पथकाने सोनार यांची वैद्यकीय तपासणी केली.

हवेचा दाब कमी झाल्याने वस्तू त्वचेला चिकटतात : अंनिस
काेराेना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सिडकाेतील ज्येष्ठ नागरिकांच्या शरीराला चमचे, नाणे, उचटणे चिकटत असल्याचे समाेर आले हाेते. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यंानी सत्यशोधन करण्याचा प्रयत्न केला. हवेचा दाब कमीत कमी झाल्यावर त्वचा आणि ती वस्तू एकमेकाला चिकटतात, असे सांगत समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठे ताट त्वचेला चिकटते हे दाखवून दिले. त्याचा व्हिडिओ तयार करत ताे प्रसारित केला. प्लॅस्टिकची वस्तूही अंगाला चिकटते. त्यामुळे चुंबकत्व निर्माण झाल्याचा दावा खाेटा असल्याचे अंनिसने स्पष्ट केले. सिडकाेतील त्या ज्येष्ठ नागरिकानेही यामागचे शास्रीय कारण शोधावे असा आग्रह धरला आहे. आरोग्य विभागानेही याबाबत वैद्यकीय सत्य समाजापुढे आणावे आणि लसीकरणाबद्दल कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन समितीचे डाॅ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, नितीन बागूल यांनी केले आहे.

अनेकांनी केला प्रयाेग
काेराेना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अंगाला लाेखंडी वस्तू चिकटत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील अनेक नागरिकांनी हा प्रयाेग करून पाहिला असता लाेखंडी वस्तू अंगाला चिकटत असल्याचे दिसून आले. यामध्ये लस न घेतलेल्यांचाही समावेश हाेता. यामुळे लस घेतल्याने हा प्रकार हाेत असल्याचा गैरसमज दूर झाला. काेराेनावरील लस सुरक्षितच असून ती सर्वांनी घ्यावी, असे स्पष्टीकरण पालिकेकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...