आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर पाेलिसांची नजर:मुले पळविण्याची अफवा पसरविल्यास फौजदारी गुन्हा

नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत असून यामुळे अनोळखी इसमांच्या जिवावर बेतण्याचे प्रकार घडत आहे. अशा अफवा पसरविणाऱ्या इसमांवर आता सायबर पोलिसांची नजर राहणार आहे. अशा प्रकारचे मेसेज ग्रुपवर फाॅरवर्ड झाल्यास ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरले जाणार असून थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती उपआयुक्त अमोल तांबे यांनी दिली.

सोशल मीडियावर मुले चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. यामुळे अनोळखी इसम व फेरीवाल्यांना संशयित म्हणून मारहाण केली जात आहे. अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्या नागरिकांवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर मेसेज पाठविणारा आणि फाॅरवर्ड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

ज्या ग्रुपमधून अशा प्रकारचे मेसेज फाॅरवर्ड झाले त्या ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा उपआयुक्त तांबे यांनी दिला.अफवांवर विश्वास न ठेवता अनोळखी व्यक्तीबाबत संशय वाटल्यास ११२ नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण विभागाचे पाेलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

जमावाकडून चाेप दिल्याचे जुने व्हिडिआे व्हायरल
मुलांचे अपहरण करणाऱ्यांना चाेप दिल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. या व्हिडिआेत तरुण मुलांना तर काही ठिकाणी महिलांना जमावाकडून मारहाण करीत असल्याचे चित्रण असून अपहरणासाठी आलेल्यांना चाेप असे मेसेज त्याखाली पाठविले जात आहेत, मात्र हे व्हिडिआे जुने व अन्य घटनांतील असून अपहरणकर्त्यांचे नव्हे, असे पाेलिसांचे म्हणणे आहे.

काही मुले-मुली बेपत्ता, अपहरण नाही
नाशिक शहरात गेल्या १५ दिवसांत १५ ते १७ वर्षे वयाेगटातील पाच मुले व चार मुली घरातून बेपत्ता झाल्या असून त्यांचे अपहरण झाल्याची अफवा व चर्चा आहे. मात्र यातील काही मुले व मुली बेपत्ता असावे तर काही साेबत गेले असावे. त्यामुळे या घटना अपहरणाच्या नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील पाेलिसांनी नागरिकांना केले आहे.