आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्टीच्या दिवशीही नागरिकांची पाण्यासाठी वणवण:सुरळीत पुरवठ्यासाठी 2 ठिकाणी क्रॉस कनेक्शन जोडणी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी औद्योगिक वसाहतीला सुटी असल्याने कामगार आराम करतात. मात्र नादुरुस्त झालेल्या जलवाहीनीचे काम पुर्ण न झाल्यामुळे सुटीच्या दिवशीही कामगारांसह, शाळकरी मुले व महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. दरम्यान महापालिकेच्या वतीने दोन ठिकाणी क्रॉस कनेक्शन जोडणी करून बायपासव्दारे सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येणार असून यासाठी शनिवारी दिवसरात्र युध्दपातळीवर काम सुरू होते. त्यामुळे रविवारी (दि.28) नागरिकांना पाणी मिळण्याची शक्यता आहे.

नागरिकांची उडते आहे तारांबळ

अमृत गार्डन चौकातील सिमेंटची जलवाहीनी नादुरुस्त झाल्याने सातपूर, सि़डको व पश्चिम नाशिक मधील नागरीकांना गेल्या चार दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी मिळवण्यासाठी सकाळपासूनच महिला, पुरुष, शाळकरी विद्यार्थी लहान मुले पाणी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागली. औद्योगिक वसाहतीत पाणी असल्यामुळे निलय इंडस्ट्रीजने नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. तसेच सातपूरला बांधकाम सुरु असलेल्या बाजीराव पगारे यांनी त्यांच्या बोअरवेलचे पाणी सकाळपासून सायंकाळ पर्यंत नागरीकांना उपलब्ध करून दिले होते.

टंकरला वाढती मागणी

सातपूर कॉलनी परिसरात नगरसेवक सलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, गिता जाधव यांनी स्वखर्चाने नागरीकांना टंकरव्दारे पाणी उपलब्ध करुन दिले. टंकरला जादा मागणी असल्याने इतर भागातील नागरीकांना सकाळपासूनच टंकरची प्रतिक्षा होती. मात्र रात्री उशीरापर्यंत त्यांना टंकर मिळू शकला नाही. महापालिकेच्या वतीने माजी नगरसेविका सीमा निगळ यांनी निगळ गल्लीत नागरीकांना टंकर उपलब्ध करून दिला होता.

पपया नर्सरी परिसरात क्रॉस केले कनेक्शन

अमृत गार्डन चौकाच्या परिसरात नादुरुस्त झालेल्या जलवाहीनीचे काम करणे धोक्याचे झाले आहे. जवळ असलेल्या नंदीनी नदीमुळे जलवाहीनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात सतत पाणी येत असल्यामुळे व मातीही ढासळत असल्याने दुरूस्तीच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे पपया नर्सरी सिग्नलच्या पुढील वडाच्या झाडाजवळ व सिग्नल जवळील पोलिस चौकीच्या मागे क्रॉस जोडणी करून बायपासव्दारे पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

चार वेगवेगळ्या एजन्सीला दिले काम

अमृत गार्डन येथील जमीनीखाली असलेल्या जलवाहीनीवर कार्यरत असलेली गॅस जोडणी, इंटरनेट केबल्स व इतर फायबर केबल्स असल्याने काम करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे खोदकाम, वेल्डिंग, फीटिंग, तसेच इतर जोडणीसाठी चार वेगवेगळ्या एजन्सीला काम देऊन अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...