आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभूमी शब्दबद्ध:‘सायक्लोरामा’ नाशिकच्या  रंगभूमीचा ऐतिहासिक ठेवा; ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची रंगभूमी शब्दबद्ध करणे हे कमालीचे अवघड काम आहे. गेल्या कित्येक वर्षांत असे काम झालेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे यांनी ‘सायक्लोरामा’ पुस्तकाच्या निमित्ताने हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी उपलब्ध करून दिला आहे. शहराच्याच नव्हे तर मराठी नाट्यसृष्टीच्या दृष्टीने ही अत्यंत मोलाची गोष्ट असल्याचा सूर मान्यवरांनी काढला.

नम्रता कलाविष्कार या नाट‌्यसंस्थेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शनिवारी (दि. ११) कुसुमाग्रज स्मारकातील सभागृहात ढवळे यांनी लिहिलेल्या ‘सायक्लोरामा’ या पुस्तकाचे प्रकाशन हेमंत टकले, लोकेश शेवडे, नितीन हिरवे, उपेंद्र दाते, प्रकाश अकोलकर, मोहन साटम, सुषमा देशपांडे, दत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ रंगकर्मी तसेच ढवळे यांच्या मित्रपरिवाराने नाटकाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी हेमंत टकले म्हणाले की, ढवळे यांच्या हृदयात रंगमंच कायम आहे. ते एक पुजारी आहे. पुजारी अशी मंदिरातील अवधानं सांभाळत असतो तसे काम ढवळे करत असतात. कोणीतरी नाट्यवेडाच अशी गाथा सांगत असतो. हे सांगण्याची ऊर्मी ढवळे यांनी या पुस्तकरूपाने दाखवली. रंगभूमीवरील अनेक स्थित्यंतरं त्यात येतात. मराठी रंगभूमीच्या इतिहासात हे पुस्तक महत्त्वाचं ठरणार आहे. प्रा. अनंत येवलेकर म्हणाले की, वामनराव पुरोहित यांनी १९६२मध्ये असं एक पुस्तक लिहिलं. त्यानंतर एवढ्या मोठ्या काळाने असं पुस्तक येणं म्हणजे हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे पुस्तक खरोखरंच वाचनीय आहे. त्यातील ऐवज हा रसरशीत आहे. अभ्यासकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक ठरणार आहे. अनेक घटना आपण फक्त सांगू शकतो मात्र त्या उतरविण्याचे एक धारिष्ट्य लागते ते ढवळे यांनी केल्याचे येवलेकर म्हणाले.

लोकेश शेवडे म्हणाले की, हे पुस्तक वाचताना ते लिहिले आहे आणि ते आपण वाचतो आहे असे वाटत नाही तर कोणीतरी आपल्याला सांगतोच आहे एवढं साधं, सरळ आणि सोपं त्यांनी लिहिलं आहे. वाचकाच्या रंजनासह हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट ठरणार, असेही त्यांनी व्यक्त केले. तर अवकाशाला टेकण्यासाठी एक क्षितीज हवं असतं ते म्हणजे सायक्लोरामा आहे, असे दत्ता पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी प्रकाशक नितीन हिरवे, मोहन साटम, प्रकाश अकोलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अरुण भावसार यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेश टाकेकर, नंदकुमार देशपांडे, हरिक्रिष्ण डिडवाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भावना कुलकर्णी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...