आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर हत्याकांड:आठ वर्षांनंतरही सूत्रधार मोकाट, सुनावणीही प्रतीक्षेतच; कट्टर हिंदुत्ववादी विचारांच्या गटाचाच ‘कट’- सीबीआयच्या तपासात झाले निष्पन्न

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन संशयित मारेकऱ्यांसह दोन मध्यमस्तर सहायक अशा पाच जणांची अटक, उच्च न्यायालयाची सहा वर्षांपासूनची करडी नजर आणि त्या माध्यमातून झालेल्या ४५ सुनावण्यांमधून “कट्टर हिंदुत्ववादी विचारांच्या गटाचा कट’ असल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न होणे या जमेच्या बाजू असल्या तरी डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यातील “मूख्य सूत्रधार’ आठ वर्षांनंतरही पडद्यामागेच आहे. तसेच पाच महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही या खटल्याची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.

२० ऑगस्ट २०१३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि विवेकवादी चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश अशा तिघांच्या हत्या करण्यात झाल्या. दरम्यान, दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांच्या याचिकेमुळे २०१५ पासून उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एकत्रितपणे करण्यात आलेल्या तपासात पाचही गुन्ह्यांमधील धागेदोरे जुळत असल्याचे पुढे आले. त्यातून वीसहून अधिक संशयित आरोपी गजाआड झाले आणि या हत्या कडव्या हिंदुत्ववादी विचारांच्या गटाने रचलेल्या “कट कारस्थाना’चा भाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

तिघे आत, दोघे बाहेर, मुख्य सूत्रधार पडद्याआड
- दाभोलकर खून खटल्यातील संशयित आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि डॉ. वीरेंद्र तावडे कारागृहात आहेत, तर त्यांना मदत करण्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले विक्रम भावे व अॅड. संजीव पुनाळेकर जामिनावर बाहेर आहेत.
- जामिनावर असताना दाभोलकर खुनाचा कट रचल्यावरून भावेंच्या जामिनाविरोधात सीबीआयने आक्षेप याचिका दाखल करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी न केल्याने दाभोलकर परिवाराने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने याच आठवड्यात तावडेला नोटीस पाठवली आहे.

आठ वर्षांतील आठ महत्त्वाचे टप्पे
- जानेवारी २०१४ : पुणे पोलिसांकडून मनीष नागोरी व विलास खंडेलवाल यांना अटक
- जून २०१४ : तपास सीबीआयकडे हस्तांतरित; नागोरी, खंडेलवालांचा संबंध बाद
- २०१५ : न्यायालयाच्या “निगराणी’खाली तपास सुरू
- फेब्रुवारी २०१५ : कॉ. गोविंद पानसरेंची कोल्हापुरात हत्या
- सप्टेंबर २०१६ : सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. वीरेंद्र तावडेसह सनातन संस्थेचे फरार साधक सारंग अकोलकर आणि विनय पवारचा सीबीआयच्या तपासात समावेश
- ऑगस्ट २०१८ : संशयित मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना सीबीआयकडून अटक
- मे २०१९ : विक्रम भावे व अॅड. संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून अटक
- मार्च २०२१ : तपास सुरू राहूदे, सुनावणी सुरू करा - उच्च न्यायालयाचा आदेेश

खटला तातडीने सुरू व्हावा
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित मारेकरी जरी पकडले गेले असले तरी यामागचे सूत्रधार अजून पडद्यामागे आहेत. त्यांना लवकरात लवकर पकडले जावे आणि हा खटला तातडीने चालू करावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. - डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

बातम्या आणखी आहेत...