आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना संध्याकाळनंतर गारवा मिळाला असला तरी रविवारी (दि. ५) मध्यरात्री झालेल्या पावसाने साेमवारी (दि. ६) दिवसभर शहरातील जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले हाेते. सिडकाे, अंबडसह शहरातील मुख्य परिसरांमध्येच वीज गायब झाल्याने नागरिक त्रस्त झाले हाेते. तर पंचवटीत खड्ड्यातील चिखलात बसचे चाक रुतल्याने वाहतुकीला खाेळंबा झाला. वीज नाही, पावसाची भुरभुर सुरू, खड्डे, पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक काेंडी यामुळे मात्र दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. दुपारनंतर मात्र जनजीवन सुरळीत झाले.
शहरात १२ मि.मी. पाऊस
शहरात रविवारी (दि. ५) मध्यरात्री विजेच्या कडकडाट ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. तर सोमवारी (दि. ६) सकाळपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. नाशिक हवामान केंद्रात १२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले हाेते. मात्र रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. तसेच कमाल तापमानात देखील घसरण झाली आहे. तर रात्री वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तसेच हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार नाशिक शहरासह जिल्ह्यात चार दिवस बेमोसमी पाऊस असेल.
या भागात वीज खंडीत
आयटीआय सिग्नल, सातपूर आयटीआयच्या मागील बाजूस असलेली आैद्याेगिक वसाहतीतील काही भाग, सिटू भवन, माहेरघर परिसर, खुटवडनगर, अंबड लिंकराेड, माेगलनगर, शिवशक्तीनगर , कामटवाडे , दुर्गानगर, त्रिमूर्ती चाैक, ज्ञानेश्वर नगर, गंगापूरराेड , पाइपलाइन राेड परिसरात विजेचा लपंडाव सुरूच हाेता. नाशिकराेडच्याही अनेक भागांमध्ये विजेचा खेळ सुरू हाेता.
वीज गायब; नागरिक त्रस्त
सिटू भवनसमाेरील सातपूर हद्दीतील फीडरमध्ये मध्यरात्री विजांचा कडकडाट हाेताच वीज पुरवठा खंडित झाला. फीडरवरील लाइन कट दिसून आल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यावरून रविवारी मध्यरात्री २ वाजेपासून खंडित झालेला वीजपुरवठा १२ तास उलटल्यांनतर साेमवारी दुपारी पूर्ववत झाला. यामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त झाले हाेते.
रामवाडीत खड्ड्यात फसली बस
रामवाडी परिसरात स्मार्ट सिटीने खाेदलेल्या खड्ड्यामध्ये प्रवाशी असलेच्या सिटीलिंकच्या बसचे चाक फसले. बसला धक्का देत खड्डयातून बस काढण्याचा प्रयत्न फसल्यानंतर क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली. मात्र वर्दळीच्या मार्गावर बस अडकल्याने वाहतूक काेंडी निर्माण झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना माेठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे स्मार्ट सिटीचा भाेंगळ कारभार पुन्हा एकदा चव्ह्याट्यावर आला आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.