आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा शहरात आता धोकादायक वाडा पडल्यास मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच, मालक किंवा भाडेकरूंनी धोकादायक वाडे स्वत:हून न उतरविल्यास पोलिस बंदोबस्त लावून मिळकती उतरविण्याबरोबरच त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचा निर्णयही महापालिका आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे महापालिका व वाडेमालकांच्या दुर्लक्षामुळे गावठाण भागातील जुन्या पडक्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी लागू करण्यात आलेली क्लस्टर योजना कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. राज्य शासनाने डीसीपीआर म्हणजेच सामायिक बांधकाम नियंत्रण नियमावलीत तरतूद केलेली असताना ही चार वर्षांत एकही प्रस्ताव सादर झालेला नसल्याची धक्कादायक बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आली आहे. यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत....
धोकादायक वाड्यांना वर्षानुवर्षे महापालिकेकडून केवळ नोटीस बजावण्याचा सोपस्कार केला जात आहे. त्यामुळे अजूनही धोकादायक वाडे ‘जैसे थे’ परिस्थितीत आहेत. शहरातील धोकादायक वाड्यांचा घरांचा प्रश्न अतिशय जटिल झाला असून वर्षभरात शहरात दहाहून अधिक वाडे कोसळण्याची घटना घडलेली आहे. जुने नाशिक, पंचवटी भागात सर्वाधिक जुने वाडे आहेत. दरवर्षी पावसाळ्यात यातील बहुतांश वाडे, घरे कोसळण्याच्या घटना घडत असतात.
महापालिकेकडून दरवर्षी नियोजनानुसार नोटीस बजावण्याचा सोपस्कार केला जातो. शहरात एक हजार धोकादायक वाडे व घरे आहे. महापालिकेकडून त्यांच्याबाबतीत कोणत्याही प्रकाराचा ठोस निर्णय घेतला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाडे कोसळण्याच्या घटना घडून जीवितहानी होण्याची दुर्घटना होत आहे. अद्यापही धोकादायक वाडे, घरांचा प्रश्न अधांतरीच आहे. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे वाड्यांची दुरुस्तीच होत नाही. तर, दुसरीकडे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांची परिस्थिती जैसे थे रहात असून हे वाडे अपघातास निमंत्रण देत आहे. नुकताच अशोकस्तंभावरही धोकादायक वाडा पडल्याची घटना घडली होती.
पालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच माहिती देण्यास टाळाटाळ
गावठाण भागातील जुन्या पडक्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना लागू करण्यात आलेली असून याची अंमलबजावणीची जबाबदारी असलेले शहर अभियंता एस. आर, वंजारी यांच्याशी गुरुवारी डी.बी. स्टारने दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वंजारी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर इतर अधिकाऱ्यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली.
वाडेकऱ्यांना एकत्र करणे शक्य नाही
एक एकर क्षेत्रातील सर्व वाडे एकत्र करून त्यांचा विकास करण्याची योजना असली तरी सर्व वाडेकऱ्यांना एकत्र करणे शक्य नसल्याने क्लस्टरसाठी एकही प्रस्ताव आजपर्यंत आलेला नाही. शहरातील धोकादायक घरे आणि वाड्यांना महापालिकेच्या वतीने दरवर्षी नोटिसा दिल्या जात असून या नोटिसांकडे दुर्लक्षच केले जात असल्याचे चित्र आहे.
या योजनेची अनेकांना माहितीच नाही
पडक्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना लागू करण्यात आलेली आहे. मात्र, महापालिकेकडून या योजनेबाबत कुठल्याही प्रकारची जनजागृती केली जात नाही. केवळ नोटीस देण्याऐवजी महापालिकेकडून योजनेसंदर्भात वाडेमालकांना माहिती दिली तर त्याचा फायदा नक्कीच होईल. - सागर बेदरकर, नागरिक
..तर करणार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मालक किंवा भाडेकरूंनी धोकादायक वाडे स्वत:हून न उतरविल्यास पोलिस बंदोबस्त लावून मिळकती उतरविण्याबरोबरच त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, धोकादायक वाडा पडल्यास मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाडे कोसळल्याच्या वर्षभरात दहाहून अधिक घटना
शहरातील जुने नाशिक, पंचवटी भागासह अशोकस्तंभ, रविवार कारंजा भागात वाडे कोसळण्याच्या वर्षभरात दहावर घटना घडल्या आहेत. जुने नाशिकमधील डिंगरआळी भागात असलेल्या धोकेदायक वाड्यांचे काही भाग वारंवार ढासळत आहेत. जुने नाशिकमधील धोकादायक झालेल्या वाड्यांचा भाग कोसळण्याच्या घटना लागोपाठ सुरूच आहे. सुदैवाने या वाड्यात कोणीही मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास नसल्याने अनर्थ टळला. यापूर्वी महापालिका प्रशासनाने आंबाडकर व जोशी वाड्याला धोकादायक म्हणून घोषित करून नोटीसही बजावली होती. या वाड्यांच्या भिंतीचा मोठा भाग काही महिन्यांपूर्वी कोसळला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.