आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यातील पहिलीच घटना:विजेच्या धक्क्याने भाडेकरूचा मृत्यू; मालकाविराेधात गुन्हा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती वापराच्या वीज मीटरमधून दुसऱ्या घरात अनधिकृत वीज जोडणी केल्याने पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या भाडेकरूला विजेचा धक्का बसून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत अखेरीस वर्षभरानंतर त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. या प्रकरणात वीज कंपनीच्या चाैकशीअंती घरमालक संताेष जाेशी याच्याविराेधात केंद्रीय विद्युत प्राधिकरण सुरक्षा व वीजपुरवठा कायद्यांतर्गत प्राथमिक तपासात दाेषी ठरवत आडगाव पोलिस ठाण्यात सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये या कायद्यांतर्गत हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.

पाेलिस कर्मचारी ज्ञानेश्वर कहांडळ यांच्या फिर्यादीनुसार, ३ आॅक्टोबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता नांदूरगाव येथील रहिवासी संताेष श्रीधर जोशी यांच्या घराला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुभाष रावसाहेब गायकवाड हे कुटुंबियांसाेबत रहात हाेते. त्याचवेळी जाेशी यांनी घरगुती वापराच्या वीज मीटरमधून अनधिकृतपणे घराच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वीजपुरवठा सुरू ठेवला हाेता. या शेडमध्ये अचानक वीजप्रवाह उतरल्याने या ठिकाणी राहणारे सुभाष गायकवाड यांना धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत गायकवाड यांचा नकळत शेडच्या लोखंडी खांबाला हात लागल्याने त्यांना विजेचा तीव्र झटका बसला हाेता.

वीज वितरणकडून तपास
गायकवाड यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे समाेर येताच वीज वितरण कंपनीने या प्रकरणाचा स्वतंत्र तपास केला. या तपासात संशयित घरमालक संताेष जाेशी यांनीच अनधिकृत वीज जाेडणी करीत पत्र्याच्या शेडमध्ये सुरक्षितपणे वीज जोडणी केली नसल्याने विजेचा प्रवाह उतरल्याने मनुष्यहानी झाल्याचा अहवाल आडगाव पाेलिस ठाण्याकडे सादर केल्यावर सदाेष मनुष्यववधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...