आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:18 व्या वर्षी एमबीबीएस, 21 व्या वर्षी एमसीएच; नाशकात प्रसिद्ध न्यूरोसर्जनच्या नावाने अनेकांची फसवणूक

नाशिक2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कशा पद्धतीने या बोगस डॉक्टरचे ऑपरेशन केले याबाबत न्यूरोसर्जनने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले

कोराेनामुळे सध्या सर्वच लक्ष वैद्यकीय क्षेत्राकडे केंद्रित झाल्याचे बघून आपले उखळ पांढरे करण्यासाठी औरंगाबादमधील एका कथित ओटी असिस्टंटने चक्क नाशिकमधील प्रसिद्ध न्यूराेसर्जन डाॅ. शेखर चिरमाडे यांचा सहायक डॉक्टर असल्याचे सांगून अनेक रुग्णांना गंडवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, आपल्या नावाचा दुरूपयाेग करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर डाॅ चिरमाडे यांनीच संबधित मुन्नाभाईशी संपर्क करीत ताे काेठून डाॅक्टर झाला, काेणते काॅलेज हाेते, ऑपरेशन कसे केले जाते याबाबत चिकित्सा केल्यानंतर थक्क करणारी माहिती मिळाली. हे महाशय जेथे साडे चार वर्षाच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी १७ व्या वर्षी प्रवेश मिळताे, तेथे चक्क १८ व्यावर्षी एमबीबीएस झाले. मास्टर इन सर्जरीशिवाय एमसीएचला प्रवेशच मिळत नसताना एमबीबीएसनंतर थेट एमसीएच झाल्याचे सांगत निष्णात डाॅक्टरांनाही हादरवून साेडले गेले. सर्व उलटतपासणी झाल्यानंतर डाॅ चिरमाडे यांनी या मुन्नाभाई एमबीबीएस ऑपरेशनची ध्वनीफित पाेलिसांकडे देण्याची तंबी दिल्यानंतर मग गयावया करीत माफी मागण्याचा प्रयत्न झाला.याप्रकरणी पाेलिस आयुक्तांकडे आयएमए या डाॅक्टरांच्या संघटनेने तक्रार केली असून संबधित मुन्नाभाईची साेशल मिडीयावर उपलब्ध झालेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या डाॅक्टराच्या नावाने फसवणुक करण्याचा गंभीर प्रकार डाॅ चिरमाडे यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला आहे. त्यांनीच ‘दिव्य मराठी’शी बोलताना कशा पद्धतीने या बाेगस डाॅक्टरचे ऑपरेशन केले यावर प्रकाश टाकला.

औरंगाबादचा रहिवासी; नाशिकला सासुरवाडी :

चिरमाडे यांनी संबंधिताचे नाव विचारल्यानंतर त्याने डाॅ. अभिलाष उपासनी असे आपले नाव सांगितले. प्रथम डाॅक्टर असल्याचे सांगणारा उपासनी हा चिरमाडे यांच्या प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर आपण आेटी असिस्टंट असल्याचे त्याने सांगितले. ताे कथितरित्या औरंगाबादचा रहिवासी असून इंदिरानगरला सासुरवाडी असल्यामुळे राहत असल्याची माहिती समाेर आली.

आयएमएमार्फत पोलिस आयुक्तांकडे तक्रार...

उपासनी नामक व्यक्तीशी माझा काेणता संबंध नाही, मी कधी भेटलेलाे नाही. मात्र रुग्णांची फसवणूक हाेण्याची भीती लक्षात घेत त्याशी संवाद साधल्यानंतर संशय निर्माण झाला. यासंदर्भात आयएमए या डाॅक्टरांच्या संघटनेमार्फत पाेलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्याची काही वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळाली असून ती बाेगस असल्याचा संशय असल्यामुळे महापालिकेमार्फत तपासणीसाठी संबधित काॅलेजकडे पाठवली जाणार आहे. - डाॅ शेखर चिरमाडे, न्यूराेसर्जन

बातम्या आणखी आहेत...