आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​जल्लाेष:शिंदे गटात प्रवेश केलेल्या 11 माजी नगरसेवकांचे मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांमध्ये नाशिकमधील ११ माजी नगरसेवकांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रवेश केल्यानंतर सायंकाळी नाशकात येत आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच पाथर्डी फाटा, शिवाजीरोड येथे फटाक्यांची आतषबाजी करून उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्यांना देखील खिजवण्याचा प्रयत्न झाला.

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली ११ नगरसेवकांचा सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास प्रवेश झाला. या प्रवेश सोहळ्यानंतर या माजी नगरसेवकांनी नाशिककडे प्रस्थान करीत संपूर्ण रस्त्यावर विविध ठिकाणी शक्तिप्रदर्शन केले. घाटनदेवीसह महामार्गालगतच्या गावागावांमधून त्यांचे स्वागत करण्यात आले. घाटनदेवी तसेच पाथर्डी फाटा येथे खा. हेमंत गोडसे तसेच अजय बोरस्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करत जयघोष केला.

त्यानंतर सीबीएस परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा येथे सर्वजण दाखल झाले. येथे ढोलताशांच्या गजरात माजी नगरसेवकांचे स्वागत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, सूर्यकांत लवटे, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, वैशाली दाणी, सचिन भोसले, पूनम मोगरे, प्रताप मेहरोलिया आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. हेमंत गोडसे यांचे मेहरोलियासोबत शक्तिप्रदर्शन भाजपच्या जिव्हारी.. शिंदे गटाकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुरुंग लावला जाणार नाही असा अघोषित करार झाल्याची चर्चा होती. त्यातून सातपूरचे भाजप प्रदेश पदाधिकारी विक्रम नागरे यांचा नियोजित पक्षप्रवेश सोहळा रद्द झाला होता. असे असताना शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या अत्यंत खास मानले जाणारे तसेच पक्षाचे उपाध्यक्ष व प्रवक्ता प्रताप मेहरोलिया यांना शिंदे गटाने गळाला लावल्यामुळे नाराजीचे वातावरण होते. त्यात खासदार गोडसे यांनी सायंकाळी मिरवणूक काढत त्यांच्यासमवेत डान्स केल्यामुळे ही भाजपच्या जिव्हारी लागली. त्यातून यासंदर्भात प्रदेशपातळीवर तक्रारी करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...