आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:गृहमंत्रिपदावरून पायउतार होणारे देशमुख राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री, छगन भुजबळ, आबांनाही द्यावा लागला होता राजीनामा

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बडे बडे शहरों में... आबांचे वादग्रस्त वक्तव्य

गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणारे अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री आहेत. याआधी छगन भुजबळ, दिवंगत आर. आर. पाटील हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अडचणीत आल्याने त्यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आघाडी सरकारांमध्ये गृहमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस कायम स्वत:कडे ठेवत आली, मात्र पक्षाच्या गृहमंत्र्यांनी निर्विघ्न कारकीर्द पूर्ण करण्याचे उदाहरण अपवादाने आहे. गेल्या १७ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन गृहमंत्र्याना राजीनामे द्यावे लागले आहेत.

तेलगी घोटाळ्यात भुजबळांचा राजीनामा : सन १९९९ मध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ गृहमंत्री होते. त्या वेळी अब्दुल करीम तेलगीचा कोट्यवधींचा मुद्रांक घोटाळा पुढे आला. या प्रकरणात भुजबळांना सन २००४ मध्ये गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची मोठा बदनामी झाल्याचे सर्वत्र चित्र निर्माण झाले होते.

बडे बडे शहरों में... आबांचे वादग्रस्त वक्तव्य
भुजबळांंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील गृहमंत्री झाले. सन २००८ मध्ये मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला आणि त्या वेळी अनवधानाने केलेले एक वक्तव्य आर. आर. पाटील यांना भोवले. ‘बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहेती हंै’ या विधानामुळे आर.आर.आबांवर टीकेची झोड उठली. अखेरीस त्यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांच्यावरही एका महिलेने आरोप लावले होते. मात्र, मुंडे यांनी या प्रकरणाची माहिती स्वत: दिली. त्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांत दिलेली तक्रारही मागे घेतली. त्यानंतर हे प्रकरण शमले. मात्र, विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...