आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 सामंजस्य करार:पालि व बौद्ध अध्ययन विभागात शब्दकोश निर्मिती, भाषांतर प्रकल्प ; पदव्युत्तर अभ्यासक्रम

नाशिक / किशाेर वाघ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पालि व बौद्ध अध्ययन विभागाचे नामांकित जागतिक दर्जाच्या संस्थांसोबत पाच सामंजस्य करार झाले आहेत. या माध्यमातून पालि व बाैद्ध साहित्याच्या हस्तलिखितांचे संपादन, भाषांतर तसेच पारिभाषिक शब्दकोशाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे. यात पाच भाग प्रकाशित झाले आहे. ५० भाग प्रकाशित केले जाणार असून नऊ विनाअनुदानित अभ्यासक्रमांसोबतच पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांचाही समावेश असल्याचे पालि व बौद्ध अध्ययन विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर यांनी सांगितले.

डाॅ. देवकर यांनी सांगितले की, २०१५ पासून विभागाने खेन्त्से फाउंडेशन इंडियासोबत करार केला आहे. यात देशविदेशातील पालि व बौद्ध अध्ययन या विषयातील तज्ज्ञ दोन महिने विभागात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यासाठी विभागाला दरवर्षी १९ लाख ७० हजार अर्थसहाय्य मिळत आहे. यातील काही प्राध्यापकांसोबत पालि आणि बौद्ध साहित्याच्या हस्तलिखितांचे संपादन आणि भाषांतर आम्ही करत आहोत. २०२० सालापासून विभागामध्ये बौद्ध पारिभाषिक शब्दकोशाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे.

या अंतर्गत आतापर्यंत शब्दकोशाचे चार भाग प्रकाशित झाले आहेत. या शब्दकोशात आजपर्यंत पालि, संस्कृत, तिबेटियन, इंग्रजी या भाषांचा समावेश होता. परंतु, या कोशाच्या पाचव्या भागापासून यामध्ये चिनी भाषेचाही समावेश करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी खेन्त्से फाउंडेशनकडून ८८ हजार अमेरिकन डॉलर्स एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. शब्दकोशाचे असे एकूण ५० भाग प्रकाशित केले जाणार आहेत. पुढील १५ वर्षे हा प्रकल्प सुरू राहणार आहे. खेन्त्से फाउंडेशन इंडिया यांच्यासोबत ‘भाषा अध्ययन कार्यक्रम’ या अंतर्गत जो दुसरा करार झाला आहे त्या माध्यमातून विभागात चालू असलेल्या नऊ विनाअनुदानित भाषाविषयक अभ्यासक्रमांना शिक्षकवृत्ती व विद्यार्थी शिष्यवृत्ती या स्वरूपात दहा लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत दोन एकत्रित पदवी अभ्यासक्रम तर काही पदविका अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...