आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईटी सेल:एमएच सीईटी परीक्षेची काठीण्यपातळी जेईई, नीट प्रमाणेच, 80 % प्रश्न 12 वीच्या अभ्यासक्रमावर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि बी. एस्सी. (कृषी) या व्यावसायिक शाखांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएच-सीईटी परीक्षा घेतली जाते. सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या करीता नवीन वर्षात २०२३ मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला असून २० टक्के प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमावर तर उर्वरित ८० टक्केे प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, जेईई मेन्स व नीट परीक्षांच्या स्तराइतकी काठिण्य पातळीएमएच सीईटी परीक्षेला असणार आहे.

बदलत्या स्वरूपामुळे विद्यार्थ्यांना आतापासून परीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी लागेल. बारावीच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेच्यादृष्टीने अभ्यासाचे नियोजन करता यावे, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रमाचा तपशील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याअंतर्गत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबतची माहिती नमूद केलेली आहे. त्यानुसार २० टक्के प्रश्न हे इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमावार आधारित असतील.

तर ८० टक्के प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. प्रश्नांची काठीण्यपातळी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयाकरीता जेईई (मेन्‍स) आणि जीवशास्त्र विषयाकरीता नीट परीक्षेच्या काठिण्यपातळी इतकीच असेल. इयत्ता बारावीशी निगडीत प्रश्न हे संपूर्ण अभ्यासक्रमातून विचारले जातील. तर अकरावीसाठी विषयनिहाय धडे निश्चित करण्यात आले आहेत. परीक्षेतील नवीन बदल विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे, असे आवाहन करण्यत आले आहे.

अशी होईल सीईटी परीक्षा, तिनही पेपरला प्रत्येकी ९० मिनिटे एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेसाठी तीन पेपर असतील. प्रत्येकी १०० गुणांसाठीच्या तीन प्रश्नपत्रिका असतील. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा (एमसीक्यू) समावेश असेल. महत्वाचे म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी गुणकपात (निगेटिव्ह मार्कींग) नसेल. गणित विषयाकरिता ५० प्रश्न (१० प्रश्न अकरावी अभ्यासक्रमाचे, ४० प्रश्न बारावी अभ्यासक्रमाचे) प्रत्येकी दोन गुणांसाठी विचारले जातील. तर पेपर क्रमांक दोनमध्ये भौतिकशास्त्रआणि रसायनशास्त्र या विषयांकरीता प्रत्येकी एक गुणासाठी ५० प्रश्न (दहा प्रश्न अकरावी अभ्यासक्रमाचे, ४० प्रश्न बारावी अभ्यासक्रमाचे) या प्रमाणे १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल. पेपर क्रमांक ३ हा जीवशास्त्र विषयाचा असून प्रत्येकी एक गुणासाठी १०० प्रश्नांचा समावेश असेल. त्यातील २० प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमावर तर ८० प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. तिनही पेपरला प्रत्येकी ९० मिनीटांचा कालावधी असेल.

एमएच सीईटीला सर्वाधिक विद्यार्थी सीईटी सेलतर्फे १४ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या एमएचटी सीईटी परीक्षेला असते. एमएच सीईटी परीक्षेला राज्यभरातून ६ ते ७ लाख विद्यार्थी प्रविष्ठ होतात. त्याची तयारी अगाेदरच करावी लागते.

बातम्या आणखी आहेत...