आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Discovery Of "Thapala" Caves In Kannada's Jamdi Ghat, Claim Of Nashik Mountaineer Sudarshan Kulthe, Confirmation Of Archaeological Directorate

दिव्य मराठी विशेष:कन्नडच्या जामडी घाटात "थापला’ लेण्यांचा शोध, नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांचा दावा, पुरातत्त्व संचालनालयाचा दुजोरा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गिर्यारोहकांसोबत औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील जामडीघाट येथे थापला नामक लेण्यांचा शोध घेण्यात अाल्याचा दावा नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी केला अाहे. या माेहिमेला पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने दुजाेरा दिला असून दुर्ग संशाेधक गिरीश टकले, राहुल साेनवणे, हेमंत पाेखरणकर यांचा माेहिमेत सहभाग हाेता.

ही शोधमोहीम ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची घटना असून राज्यातील पुरातत्त्वात एका लेण्याची भर पडली आहे. थापला डोंगरावरील लेण्यांबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती. हे स्थळ अप्रकाशित होते. राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांचे मार्गदर्शन व जामडी गावातील विनोद चव्हाण यांचे सहकार्य लाभले. कन्नड या तालुक्याच्या ठिकाणाहून पश्चिमेकडे अगदी १२ किमी अंतरावर जामडी घाट गाव आहे. बंजारा समाजबहुल या भागात सुरपाळनाथ या प्रसिद्ध पर्वताशेजारी चुंडी-थापला नावाचा डोंगर आहे. उंच टोक असलेल्या भागाला ‘चुंडी’ तर सपाट भागाला ‘थापला’ अशी स्थानिक बंजारा भाषेतील नावे आहेत. त्यापैकी सपाट थापला भागावर लेणी आढळून आली आहेत. याचे भौगोलिक स्थान २०.२५४४७, ७५.०५१७६० असून उंची समुद्रसपाटीपासून २८०५ फूट (८५५ मी.) असून माथ्याचे क्षेत्रफळ सुमारे २.४० एकर एवढे भरते.

थापला लेणीची वैशिष्ट्ये : थापलाच्या चढाई मार्गावर कोरीव पायऱ्यांचे अवशेष दिसून येतात. उभ्या खडकांवर चढताना आधारासाठी कोरीव खाचे दिसून येतात. माथ्यावर दक्षिण टोकावर चिंचोळ्या भागावर काही ठिकाणी गोलाकार कोरीव खळगे आढळतात. उत्तर दिशेकडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी असल्यासारखा आयताकृती खोदीव भाग आहे. आत उतरण्यासाठी मोठ्या कोरीव पायऱ्या असून खाली गेल्यावर पश्चिम भिंतीत कोरीव गुहा आहे.
उत्तर भिंतीत पुन्हा तीन खांब असलेली गुहा आहे. यात पाणी साठलेले आहे. मध्यभागी अजून एक खोलगट खोदीव लेणे आहे. तळघरासारखी भली मोठी खोली दिसून येते. हे एक विहार लेणे आहे. एक महत्त्वपूर्ण शोध असून पुरातत्त्व अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

अकराव्या शतकातील लेणी
‘जामडीच्या थापला किल्ल्यावरील लेणी या देवगिरी-दौलताबाद परिसरात आढळणाऱ्या लेण्यांच्या भागातच आहेत. ११-१२ व्या शतकातील लेणी असून वेरूळची हिंदू-जैन लेण्यांच्या काळातील असण्याचा तर्क आहे. यावर उत्खननास भरपूर वाव आहे. - डॉ. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्त्व विभाग

बातम्या आणखी आहेत...