आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प स्थलांतरित:टाकाऊ बांधकाम साहित्याची विल्हेवाट मखमलाबादला

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरामधील केरकचरा संकलित करून ज्या पद्धतीने खत प्रकल्पावर त्याची विल्हेवाट केली जाते त्याच पद्धतीने आता शहरातील टाकाऊ बांधकाम साहित्य विल्हेवाटीसाठी आता मखमलाबाद येथे प्रकल्प उभारला जाणार आहे. स्वच्छ शहर स्पर्धेत वारंवार बांधकाम साहित्याची विल्हेवाट होत नसल्यामुळे बसणारा फटका लक्षात घेत तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी पाथर्डी खत प्रकल्पाजवळ जागा उपलब्ध होत नसल्याचे बघून मखमलाबादला हा प्रकल्प स्थलांतरित केला आहे. मुंबई-पुण्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील टाकाऊ बांधकाम साहित्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न भिजत आहे. महापालिकेत मनसेची सत्ता असताना २०१२ ते २०१७ या कालावधीमध्ये देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः यासंदर्भात लक्ष घातले होते. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सद्यस्थितीमध्ये नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गगनचुंबी इमारती उभ्या रहात असून दुसरीकडे तीस ते पन्नास वर्षांहून अधिक जुन्या इमारती तोडल्या जात असल्यामुळे बांधकाम साहित्य विल्हेवाटीचा प्रश्न गहन झाला आहे. सद्यस्थितीत विकासक, नागरिकांकडून टाकाऊ बांधकाम साहित्य रस्त्याच्या, नदीच्या कडेला टाकत असल्यामुळे त्याचा फटका केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेत बसत आहे. गेल्या सहा वर्षांपासून स्वच्छ शहर स्पर्धेत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकला येता आलेले नाही. ही बाब लक्षात घेत पलिकेने पाथर्डी येथील खत प्रकल्पासमोरील सर्वे क्रमांक २७९/१/२ मधील जागा या प्रयोजनासाठी आरक्षित केली तसेच संबंधित काम करण्यासाठी मे. वॉटरग्रेस प्रॉडक्ट‌्स, नाशिक यांचा ठेकाही निश्चित करण्यात आला. मात्र प्रस्तावित जागेच्या भूसंपादनात प्रतिसाद न मिळाल्यामुळे तत्कालीन प्रशासक पवार यांनी नगरनियोजन व यांत्रिकी विभागाची एकत्रित बैठक घेत प्रकल्प उभारणीसाठी नवीन जागा सुचविण्याचे नगरनियोजन विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार नगरनियोजन विभागाने मखमलाबाद शिवारातील सर्वे क्रमांक ३२३/२/२ मधील क्षेत्र पर्यायी जागा म्हणून सूचविले. यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तत्कालिन प्रशासक पवार यांच्या स्वाक्षरीने त्याचे ठरावात रूपांतर करण्यात आले आहे.

साडेपाच एकर क्षेत्रावर प्रकल्प
मखमलाबाद शिवारातील सर्वे क्रमांक ३२३/२/२ मधील २१८०० चौरस मीटर अर्थात सुमारे साडेपाच एकर क्षेत्रावर टाकाऊ बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील बांधकाम साहित्यची विल्हेवाट लावण्यास मदत होणार असून शहर सौंदर्यकरणास हातभार लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...