आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआच्या विजयी जल्लाेषातही नाशिक काॅंग्रेसमध्ये गटबाजी:छाजेडांच्या नेतृत्वाविराेधात माजी मंत्री, माजी पदाधिकाऱ्यांचे उघड बंड

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणूक कधीही लागू शकते अशी परिस्थीती असताना पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा झालेला पराभव नाशकातील महाविकास आघाडीसाठी हिमंत वाढवणारा ठरला आहे. म्हणूनच की काय प्रथमच उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रवादीने काॅंग्रेसच्या महात्मा गांधी राेड येथील कार्यालयासमाेर जात ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तर शहराध्यक्ष आकाश छाजेड यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे काॅंग्रेसच्या दाेन्ही गटांनी स्वतंत्ररित्या जल्लाेष प्रदर्शन केले.

दुसऱ्या गटात माजी मंत्री डाॅ शाेभा बच्छाव, मावळते शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह माजी नगरसेविका हेमलता पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी असल्यामुळे काॅंग्रेसमधील असंताेष चिंतेचा विषय बनला आहे.

गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर नाशकात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे उधाण आले. जून महिन्यात महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत उभी फुट पाडून भाजपाने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना विराजमान केले.

आघाडीतील प्रमुख पक्षच फुटल्यामुळे महाविकास आघाडीतील समन्वयही हरवल्याचे चित्र हाेते. खासकरून, ठाकरे यांच्या गटाला हादरा बसला हाेता. अशा परिस्थीतीत महापालिका निवडणुक झाली तर ठाकरे यांच्या पक्षाचा कस लागणार आहे मात्र पुण्यातील निवडणुकीच्यानिमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीने दाखवलेली एकी कसबा मतदारसंघातील विजयामुळे चर्चत आली. त्यामुळे नाशकातील पदाधिकाऱ्यांचा हुरूप वाढून त्यांनी थ‌ेट कधी नव्हे तर काॅंग्रेस कमिटीसमाेर जात जल्लाेष केला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून, फटाके फोडण्यात आले.

कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड, वत्सला खैरे, आशा तडवी, राष्टवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल, माजी महापौर वसंत गिते, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, सचिन मराठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काॅंग्रेसमध्ये दाेन्ही गटांचे स्वतंत्र जल्लाेष प्रदर्शन

महाविकास आघाडीने एकत्र येत कॉँग्रेस शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांच्या उपस्थितीत कॉँग्रेस कमिटीसमोर जल्लोष साजरा केला. मात्र छाजेड यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे शहरातील रेड क्रॉस येथील आंबेडकर कॉलनीसमोर फटाके फोडून, पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश कॉँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, राजेंद्र बागुल, बबलू खैरे, ब्लॉक अध्यक्ष उध्दव पवार, मागासवर्गीय विभागाचे सरचिटणीस सुरेश मारू यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी हजर हाेते.

बातम्या आणखी आहेत...