आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुचर्चित हनुमान जन्मस्थळाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयासह राज्य व केंद्र सरकारकडेदेखील जाणार आहे. अंजनेरीच हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचे सर्व पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर करून त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असा एकमुखी निर्णय आज साधू-महंत, अंजनेरी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.
नाशिकमधील साधू- संत-महंत, पालकमंत्री, खासदार, आमदार व अंजनेरी ग्रामस्थ यांची लवकरच स्वतंत्र ग्राम परिषद घेण्यात येणार आहे. परिषदेत हनुमान यांचे जन्मस्थळ अंजनेरीच असून, भविष्यात याबाबत कुठलाही वाद होऊ नये, असा ठराव करण्यात येणार आहे. हा ठराव केंद्र आणि राज्य सरकारला पाठवला जाईल, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
एकत्र लढा देणार
गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी हनुमान जन्मस्थळाचा वाद उगाच उकरुन काढल्याचा आरोप आज झालेल्या बैठकीत साधू-महंतांनी केला. हनुमान जन्मस्थळाबद्दल कोणीही अपशब्द, चुकीचे अर्थ आणि इतिहासाची तोडमोड करून अंजनेरीचे महत्त्व कमी करत असेल, तर आम्ही सर्व मिळून त्याला विरोध करू. त्याला मोडून काढू. आमच्यात अंतर्गत वाद असला तरीही आमच्या धार्मिक स्थानांसाठी आम्ही एकत्र येऊन लढा देणार, असे आश्वासन यावेळी सर्व साधू-महंतांनी दिले. तसेच, गडावरील हनुमान जन्मस्थळ येथे १११ फुटी धर्मध्वज अन् भव्य मंदिर उभारणार असल्याचे अंजनेरी ग्रामस्थांच्या वतीने राजाराम चव्हाण यांनी सांगितले.
भविष्यात वाद होऊ नये म्हणून...
नुकत्याच झालेल्या धर्मसभेत आम्ही सर्व पुरावे देऊनही बाहेरुन कुठूनतरी आलेले एक महात्म्ये ऐकतच नव्हते. त्यांना अतिथी सन्मान दिला. पण, ते त्या लायकीचेच नव्हते, अशी टीका यावेळी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केला. पण, अयोध्येतील आचार्य गंगाधर पाठक यांनी अंजनेरीवर शिक्कामोर्तब केला आहे. परंतु पुन्हा भविष्यात वाद निर्माण होऊ नये म्हणून आम्ही सर्व पुरावे एकत्र करुन न्यायालयातून अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचे कायमस्वरुपी अधिकृत करुन घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
हात उगारणाऱ्या महंतांचा सत्कार
हनुमान जन्मस्थळावरुन निर्माण झालेल्या वादात महत्त्वाची भूमिका बजावणारे अन् गोविंदानंद महाराज यांच्यावर माईक उगारणारे महंत सुधीरदास यांच्यासह इतर साधू-महंतांचा अंजनेरी ग्रामस्थांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थळ असल्याचे अयोध्येतील रामजन्मभूमीचे आचार्य गंगाधर पाठक महाराज यांनीदेखील जाहीर केले आहे. त्याचा आनंदोत्सव अंजनेरी गडाच्या पायथ्याजवळील श्री हनुमान मंदिर येथे आज साजरा करण्यात आला. यावेळी पंचमुखी हनुमान मंदिर प्रमुख आणि दिगंबर आखाड्याचे भक्ती चरणदास महाराज, राष्टसंत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्यासह नाशिक -त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांचाही सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.