आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रचंड थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत आली. आता कुठे बँकेच्या बड्या थकबाकीदारांची नावे सर्वसामान्य सभासदांच्या समोर येत असून बिगर शेती कर्ज वर्षानुवर्ष थकवलेल्यांची यादी बँक कधी जाहीर करते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. कारण या प्रकारात थकलेले कर्ज देखील मोठ्या प्रमाणावर माजी संचालकांच्या कुटुंब किल्ल्याकडेच आहे.
जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी ठोस पावले उचलल्यानंतर अनेक थकित शेतकऱ्यांची नावे गावाच्या वेशीवर झळकली. केवळ काही लाखांच्या थकबाकी पोटी, त्यांच्या ट्रॅक्टर, पिकअप सारख्या वाहनांचे लिलाव देखील झाले. समाजात या शेतकऱ्यांची मोठी मानहानी झाली, मात्र खऱ्या अर्थाने जिल्हा बँकेची सत्ता भोगलेल्या आणि त्या सत्तेतून आपल्या कुटुंब कबिल्यातील नावाने कोट्यावधींचे कर्ज काढून ते अद्याप पावतो न फेडणाऱ्याची नावे कधी समोर येतील? असा प्रश्न हातबल झालेला शेतकरी उपस्थित करत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये बँकेचे नियंत्रक असलेल्या विभागीय सहनिबंधकांकडून बिगर शेती कर्ज वसुलीसाठी बँकेला काय निर्देश आणि मार्गदर्शन केले गेले? अद्यापही या बड्या थकबाकीदारांच्या विशेषतः निफाड तालुक्यातील याद्या का लागल्या नाही? याबाबत सभासदांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.
दैनिक दिव्य मराठी जिल्हा बँक वाचली पाहिजे कारण ती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनी आहे. ती वाचली पाहिजे, हा विचार घेऊन गेल्या सात वर्षांपासून बँकेतील अनेक गैरव्यवहार वारंवार जनतेच्या समोर आणले. भारतीय रिझर्व बँक असो की, नुकतीच गाजत असलेली कलम 88 अंतर्गत ची चौकशी असो की संचालकांवर निश्चित झालेली जबाबदारी असो, या सगळ्या प्रश्नांवर सातत्याने वाचा फोडली आहे. शनिवारी दिव्य मराठी ने बँकेचे माजी पदाधिकारी आजी-माजी आमदार यांच्या कुटुंब कबिल्यातील कर्ज थकबाकीच्या संदर्भामधील वृत्त प्रकाशित केल्याने जिल्हाभरात खळबळ माजली आहे.
शनिवारी दिव्य मराठी मध्ये प्रसिद्ध झालेल्या बँकेच्या माजी चेअरमन संचालक आणि त्यांच्या कुटुंबकबिल्यातील सदस्य यांच्याकडील थकबाकीच्या संदर्भातील बातमीत माजी खासदार आणि बँकेचे माजी चेअरमन देविदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांचे नाव प्रसिद्ध झाले. आनंद ऍग्रो या कंपनीच्या संदर्भातील बिगर शेती कर्ज प्रकरणातील थकबाकी संदर्भातील हे नाव होते. मात्र या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही, कुठल्याही कर्ज प्रकरणाच्या कागदपत्रांवर मी स्वाक्षरी केलेली नाही. या प्रकरणा बाबत मी उच्च न्यायालयामध्ये लढा लढतो आहे अशी स्पष्टोक्ती गोकुळ पिंगळे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.