आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सारथी'ला जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा सुपूर्द:नाशिकला विभागीय कार्यालय; मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह उभारणार

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी नाशिकमध्ये 'सारथी'चे विभागीय कार्यालय होणार आहे. विविध कोर्सेसचे प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका आणि वसतिगृह उभारण्यासाठी ​​​​​​ शासनाने आदेशानुसार, प्रस्तावित जागेचा आज प्रत्यक्ष ताबा जिल्हा प्रशासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला ( सारथी ) दिला आहे. जागा ताब्यात मिळाल्याने आता प्रशिक्षण व वसतिगृह उभारण्याच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्या मंजुर व्हाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीचे नेते, छत्रपती संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर काही दिवस उपोषणही केले होते. सारथीचे केंद्र फक्त पुणे येथेच होते. या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका , वसतीगृह आणि इतर प्रशिक्षण दिले जात असते . यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना पुणे येथील सारथीच्या केंद्रात प्रवेश घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत असे . सारथीचे केंद्र नाशिक येथे व्हावे यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार. हेमंत गोडसे पाठपुरावा करत होते.

दिड वर्षांपूर्वी गोडसे यांनी पुण्यातील सारथी कार्यालयाला भेट देवून राज्यातील सर्वच महसूली शहरांमध्ये सारथीचे कार्यालय उभारावेत अशी आग्रही मागणी तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

राज्य शासनाने नुकताच आदेश काढत पंचायत समितीला लागून असलेली जागा सारथीला देण्यासाठी मान्यता दिली होती. जागेला मंजूरी दिल्यानंतर गोडसे यांनी याविषयीची मुळ फाईल मंत्रालयातुन आणत जिल्हा प्रशासनाकडे देत जागा ताब्यात देण्याविषयीची पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी सदर जागेचा कब्ज़ा सारथीला देण्याचे प्रशासनाला आदेशित केले होते.

आज सकाळी सारथीचे स्थावर व्यवस्थापक अभय पालवनकर हे सारथीसाठीच्या जागेचा प्रत्यक्ष कब्जा घेण्यासाठी शहरात दाखल झाले होते. तहसिलदार अनिल दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी अनिल रोकडे, तलाठी गौतम आठवले, कोतवाल दिनेश आहिरे आदींनी पालवनकर यांना जागेवर नेत जागा दाखविली. त्यानंतर जागा हस्तांतरणची कब्जा पावती करून सदर कब्जा पावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालवनकर यांना देण्यात आली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार अनिल दौडे, राजेंद्र नजन आदी अधिकारी उपस्थित होते. या प्रक्रियेमुळे नाशिक येथे सारथीचे विभागीय कार्यालय उभारण्याचा मार्ग पूर्णतः मोकळा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...