आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपातील कार्य:विभागीय अधिकाऱ्यांचे हात बळकट होणार, समिती गठित; प्रशासकीय कामकाजास गती मिळण्यासाठी प्रयत्न

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या कारभाराला गती मिळावी तसेच सर्वसामान्यांशी संबंधित प्रश्न विभागीय स्तरावर सुटावेत यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी विभागीय अधिकाऱ्यांना सर्वाधिकार देण्यासाठी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे.

नाशिक शहरात सहा विभाग असून या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. स्थानिक पातळीवर काम करताना विभागीय अधिकाऱ्यांना पुरेसे अधिकार नसल्यामुळे अडचणी येत आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी महिनाभर कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यालयातच सर्व अधिकार केंद्रित असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे विभागीय अधिकारी हातावर हात धरून बसत असल्यामुळे गैरप्रवृत्तींचे फावले होते. पालिका मुख्यालयात बसून परवानगीही एकानेच द्यायची व कारवाईही भलत्याने करायची असा प्रकार समोर आला आहे.

ही बाब लक्षात घेत आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे प्रमुख अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महत्त्वाच्या प्रकरणातील परवानगीचे अधिकार पालिका खातेप्रमुखांकडे असतील तर संबंधित परवानगीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना असणार आहेत.

यासंदर्भात अंतिम रूपरेषा निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेत सात अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. प्रशासन उपायुक्त घोडे पाटील हे समितीचे अध्यक्ष असून सात दिवसांत आयुक्तांना विभागीय अधिकाऱ्यांकडे कोणते अधिकार असावेत, याबाबतचा अहवाल द्यावा लागणार आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे मुख्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहे.

बातम्या आणखी आहेत...