आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट:मुलीचा शब्द कसा पाळू, बायकोचा दागिना कसा सोडवू? त्यापेक्षा मेलेले बरे, शेतकऱ्याचा आर्त टाहो

अभिजित कुलकर्णी | नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खर्च तीनपट आणि उत्पन्न एक पट यामुळे रंजिस आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आर्त टाहो

नातीच्या लग्नासाठी जमवलेले ५० हजार रुपये पीक हाती आल्यावर त्यात तेवढीच भर घालून परत करू या बोलीवर मुलीकडून आणले होते, शिवाय बायकोचा दागिनाही गहाण ठेवत कांदा लागवडीसाठी कसेबसे भांडवल उभे केले. मात्र, कांदा विकून हाती ३० हजारही आले नाहीत. आता मुलीला दिलेला शब्द कसा पाळायचा आणि पुढच्या हंगामासाठी लागवड कशी करायची, याचे कोणतेही उत्तर नसल्याने आत्महत्येचे विचार मनात येत असल्याची व्यथा वेळापूरचे रतन भागवत यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.

विशेष म्हणजे, देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावपासून भागवत यांचे शेत अवघे साडेसहा किलोमीटरवर आहे. ‘दिव्य मराठी’ जेव्हा भागवत यांच्या बांधावर पोहोचला तेव्हा साठी उलटलेले रतन हे जीर्ण झालेली अर्धी विजार आणि जुनाट कोपरी घालून शेतात राबत होते. शेत कुणाचे हे विचारले असता प्रथम त्यांचा मुलगा मदन पुढे आला. कांद्याच्या सद्य:स्थितीबाबत विचारले असता, बाजूला काम करत असलेल्या रतन यांनी भरल्या डोळ्यांनी आपली दुर्दशा सांगायला सुरुवात केली. पीक हाती आले की बियाण्यापासून औषधापर्यंत सगळ्यांची देणी फेडू आणि नातीच्या लग्नालाही हातभार लावू या भरवशावर होतो, पण आता तर अशी स्थिती आहे, की घरात गॅस सिलिंडर पुन्हा भरायलादेखील पैसा नाही. त्यामुळे सध्या शेतातल्या सरपणावरच चूल पेटवणे भाग पडत आहे. एवढेच कशाला, नातवाला काल शाळेत ४० रुपये भरायचे होते, तेसुद्धा नाहीत. त्यामुळे शेतीपेक्षा मजुरी किंवा थेट आत्महत्याच केलेली बरी... हे सांगताना रतन यांचे डोळे पाणावले होते.

लासलगाव असो की सर्वाधिक कांदा पिकविणारा देवळा-कळवणचा भाग. कांदा उत्पादकांची अवस्था सारखीच आहे. देवळा तालुक्यातल्या मटाणे येथील हेमंत आहेर याची बारावीची परीक्षा सुरू आहे. मात्र, तरीही दिवसभर त्याला कांद्याच्या शेतात राबणे भाग पडत आहे. कारण, मजुरी प्रचंड वाढली आहे आणि तो दर परवडत नाही.

निफाड तालुक्यातील नैताळेच्या सुनील बोरगुडे यांनी तर बाजारात कांदा विकून येणाऱ्या पैशापेक्षा वाहतूक खर्चच जास्त लागेल म्हणून चक्क आपल्या शिवारातील दोन एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवून तो नष्ट केला. कांद्याच्या भरवशावर असलेल्या शेतकरी कुटुंबांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे सध्याची एकूण स्थिती स्पष्ट करणारी असून सरकारने वेळीच त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या हाती महिन्याकाठी एकरी फक्त ८ हजार
एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्चून चार महिने जिवापाड मेहनत केल्यानंतरही कांदा उत्पादकांच्या हाती महिन्याकाठी जेमतेम सात ते आठ हजार रुपये पडत आहेत. क्विंटलमागे कांद्याला सरासरी केवळ ५०० ते ६०० रुपये मिळत असल्याने तीनपट खर्च अन् एक पट उत्पन्न अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. रोप तयार करण्यापासून ते कांदा बाजारात नेईपर्यंत शेतकऱ्यांना एकरी साधारणपणे ६० ते ७० हजार खर्च कसा येतो ते साेबतच्या काेष्टकात स्पष्ट हाेईल. सध्या बाजारात येत असलेल्या खरिपाच्या लाल कांद्याचे एकरी उत्पादन ७० ते ८० क्विंटल होते. त्यातील जेमतेम ६० ते ६५ क्विंटल कांदा बाजारात प्रत्यक्ष पोहोचतो. अशा स्थितीत क्विंटलला सध्याप्रमाणे ५०० रुपये मिळाल्यास एकरी ३० ते ३२ हजार रुपये हाती येतात. ते देखील चार महिन्यांनंतर. म्हणजे, महिन्याकाठी विचार केल्यास सरासरी केवळ साडेसात ते आठ हजार रुपये. एवढ्या तुटपुंज्या उत्पन्नात घरखर्च देखील भागत नसल्याने कुटुंबाची गुजराण कशी करायची, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

कांद्याचा एकरी खर्च असा 1500 रुपये रोप टाकण्यासाठी मशागत 6000 रुपये चार किलो बियाणे 6000 रुपये बियाण्यासाठी खते व औषधे 13000 रुपये लागवड व मजुरी

14000 रुपये हंगामातील औषध फवारणी व खते 4000 रुपये निंदणी 15000 रुपये नांगरणी, रोटाव्हेटर, पाणी भरणे व इतर 15000 रुपये कांदा काढणी, साठवणूक व वाहतूक

बातम्या आणखी आहेत...