आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या धकाधकीच्या जीवनात आराेग्य संवर्धनासाठी योगा हा महत्त्वपूर्ण ठरत आहे. योगाबाबत जनजागृतीसह प्रशिक्षण देण्याचे काम पटणी कुटुंबियांकडून केले जाते. विशेष म्हणजे योगाच्या माध्यमातून पटणी कुटुंबातील सर्व सदस्यांनी विक्रमाला गवसणी घालत नाशिक शहराचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर उंचावत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
होमिओपॅथी डॉक्टर पराग पटणी यांनी नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सलग २६ तास ३० मिनिटे योगा करत नव्या विश्वविक्रमाला साद घातली आहे. यापूर्वी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सलग योगासने करण्याचा अमेरिकन नागरिकांचा २४ तासांचा विक्रम डॉ. पटणी यांनी मोडीत काढला असून या विक्रमांची लवकरच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोद होणार आहे. योग प्रशिक्षण देणाऱ्या डॉ. काजल पटणी यानी योगशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केली आहे.
दुसऱ्या प्रेग्नसीत कंबरदुखी दूर करण्यासाठी काजल योगाकडे वळल्या. प्रेग्नसीमध्येच त्यांनी योगाचा अभ्यास करत त्यात प्रावीण्य मिळवले. याच प्रावीण्याच्या जाेरावर ६३ पेक्षा अधिक देशात त्या योगाचे धडे देत आहेत. त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ७८ पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले. जागतिकस्तरावर आंतरराष्ट्रीय योगाशिक्षक व योगा प्रशिक्षक अशी ओळख प्राप्त केली आहे.
मुलांचेही नेत्रदीपक यश
आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत १४ वर्षीय गीत पराग पटणीने जगातील सर्वात तरुण योगशिक्षक म्हणून ओळख निर्माण केली आहे. ग्लोबल फेम पुरस्कार, उदयोन्मुख तरुण योगशिक्षक, ध्रुवरत्न पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला आहे. १० वर्षांची असल्यापासून ती योगा शिकवते. तिचे अनेक विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत विजेते आणि उपविजेते झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत ४ सुवर्ण, राष्ट्रीय योग चॅम्पियनशिपमध्ये ५ सुवर्ण, राज्य योग चॅम्पियनशिपमध्ये ९ सुवर्णपदके तिने मिळवली. अलिकडेच तिने एका मिनिटांत ३९ योगासन करत सर्व विक्रम मोडीत काढले. तिच्या या कामगिरीची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. याबरोबरच १४ वर्षीय आदित्य पराग पटणी याने यंगेस्ट एरियल स्पोर्ट्स ट्रेनर अशी नवी ओळख प्राप्त केली असून तीन वर्षांपासून तो मुलांना एरियल स्पोर्ट्सचे धड देत आहे. १ मिनिटांत १०४ पुशअप काढण्याचा त्याचा विक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोदला गेला. याचप्रमाणे १७ वर्षीय सम्यक पराग पटणीने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.