आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण:निर्घृण खूनामागील सूत्रधार अजूनही मोकाटच, अंनिसचे नाशकात आंदोलन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील महर्षी वि. रा. शिंदे पुलावर निर्घृण खून करण्यात आला. त्या दुःखद घटनेला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर प्रसिद्ध विचारवंत व राजकीय कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. या घटनांमागे असलेले मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अंनिसतर्फे प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करत जाब विचारण्यात आला.

महाराष्ट्रातील या थोर विचारवंतांनी आयुष्यभर फुले-शाहू-आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या सारख्या पुरोगामी विचारवंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला. मात्र अशा पुरोगामी विचारवंतांचा निर्घृण खून होणे ही पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्राला भूषणावह बाब नाही.

प्रा. कलबुर्गींची हत्या

महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे अभ्यासक आणि संशोधक प्रा. कलबुर्गी यांचीही त्यांच्या घराजवळ हत्या करण्यात आली. लगेच पुढील काही दिवसात निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांचीही याच पद्धतीने जीवनयात्रा संपवण्यात आली.

तपासात ढिसाळपणा

डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी व सूत्रधार यांना त्याचवेळी अटक करून न्यायालयात हजर केले असते तर पुढील तीनही खून झाले नसते. दरम्यानच्या काळात तपास यंत्रणांनी काही संशयित आरोपी पकडले आणि न्यायालयासमोर उभे केले. मात्र ह्या सर्व बाबी न्यायालयासमोर येण्यास तब्बल आठ वर्षाचा कालावधी जावा लागला. तपासामध्ये असलेला ढिसाळपणा आणि सरकारची याबाबत असलेली अक्षम्य दिरंगाई व उदासीनता हेच याचे मुख्य कारण आहे. याबद्दल न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत.

मुख्य सूत्रधार मोकाट

मात्र अद्याप या सर्व चारही खूनामागील मुख्य सूत्रधार मोकाटच आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत यांच्या जीवाला अजूनही धोका संभवतो. अशा सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण मिळेल, अशा प्रकारचा कायदा होणे अतिशय गरजेचे आहे.

मुख्य सूत्रधारांना अटक करा

राज्य सरकार व केंद्र सरकारने या बाबतीत जाणीवपूर्वक लक्ष घालावे आणि तपास यंत्रणांनीही अधिक खोलात जाऊन, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तपास करावा ह्या खूनांमागील मुख्य सूत्रधारांना अटक करावी. त्यांना न्यायालयासमोर उभे करावे. अशी मागणी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे एका सविस्तर निवेदनाद्वारे महाराष्ट्र अंनिसतर्फे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, महेन्द्र दातरंगे, राजेंद्र फेगडे, अरूण घोडेराव यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...