आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयभवानी मार्गावरील तुळजाभवानी मंदिराच्या बाजूला असलेल्या महापालिकेच्या उद्यानात सामाजिक कार्यकर्त्यांनी एका चबुतऱ्यावर अलिकडेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला होता. मात्र हे अतिक्रमण असल्याची तक्रार महापालिकेच्या उद्यान विभागातील एका कर्मचाऱ्याने उपनगर पोलिस ठाण्यात केली हाेती. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने सोमवारी रात्री उशीरा पोलिस बंदोबस्तात हा पुतळा हटविला. परिणामी मंगळवारी (दि. १३) सकाळी परिसरातील नागरिकांना पुतळा हटविल्याचे कळताच त्यांनी उपाेषण, आंदाेलनाचे हत्यार उपसले. रास्ता राेकाे केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. अखेर पालिकेच्या उपायुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल आठ तासांनी आंदाेलन मागे घेण्यात आले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात अतिरिक्त पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.
साेमवारी रात्री उशीरा पालिकेने पुतळा काढल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भालेराव मळा परिसरातील नागरिकांनी हातात डाॅ. बाबासाहेबांची प्रतिमा घेत रास्ता रोको केला. यावेळी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे तणावात वाढ झाली हाेती. नागरिक बुद्धवंदना घेत माजी नगरसेविका सरस्वती भालेराव, विजय भालेराव यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसले. जोपर्यंत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आम्हाला परत देत नाही तापर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची उपाेषणकर्त्यांनी भूमिका घेतली.
महापालिकेच्या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची मागणी करण्यात आली. जयभवानी रोडवर नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यावेळी शशिकांत उनवणे, अमोल पगारे, समीर शेख, इंद्रजित भालेराव, विनोद भालेराव, निखिल भालेराव, महेंद्र भालेराव, विकास भालेराव, महेश सुकेणकर, गोटीराम पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तर पोलिस निरिक्षक नीलेश माईनकर, अनिल शिंदे, गणेश न्यायदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पुतळा देत नाही, तोपर्यंत उपोषण
पालिकेने सोमवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास काढलेला डॉ. आंबेडकर यांचा पुतळा आमच्या ताब्यात द्यावा. एवढेच नव्हे तर डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचे देखील पुतळे महापालिकेतर्फे या ठिकाणी बसविले जावेत, अशी आमची भूमिका आहे. - संजय भालेराव,स्थानिक आंदाेलनकर्ते
पुतळा बसविण्यासाठी शासननियमानुसार ना हरकत दाखला देऊन प्रस्ताव सादर करा...
महापालिकेच्या उद्यानात महापुरुष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी शासनाच्या नियमानुसार ना हरकत दाखले सादर करा, तसेच उद्यानात असलेल्या महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा, ते वरिष्ठांना पाठविण्यात येऊन पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी पालिकेच्या वतीने सहकार्य करण्यात येईल. असे लेखी पत्र पालिकेच्या वतीने देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
घेतली अधिकाऱ्यांची भेट
पालिकेकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा दिलेला हाेता. मंगळवारी (दि. १३) पवन पवार, संजय साबळे, अर्जुन पगारे, कैलास तेलोरे, विजय भालेराव, आकाश भालेराव यांनी पुतळा पुन्हा बसविण्यात यावा, उद्यान आणि पाण्याच्या टाकीला डाॅ. आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांसाेबत चर्चा
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुतळ्यासंदर्भात समिती असते, ती समिती निर्णय घेत असते. तसेच हा राज्य शासन पातळीवरील विषय असल्याने जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून लेखी पत्र देण्यात येईल. - डॉ. विजय मुंडे, उपायुक्त, उद्यान विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.