आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उद्यानांमध्ये टवाळखोरांकडून अमली पदार्थांचे सेवन; सातपूर परिसरात रहिवाशांचे पोलिस आयुक्तांना कारवाई करण्याचे साकडे

सातपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील विविध उद्याने, जॉगिंग ट्रॅकचा मद्यपींनी अगोदरच ‘ताबा’ घेतलेला असतानाच आता टवाळखोरांचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे, येथे लहान-मोठ्या प्रमाणावर वाद होत आहेत. सर्वसामान्य नागरिक विशेषतः महिलावर्गाची सुरक्षा आता ‘रामभरोसे’ राहिली आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच गस्त घालत टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिस आयुक्तांना निवेदनाद्वारे महिलावर्गाने केली आहे.

सातपूर-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्यावरील छत्रपती राजे संभाजी उद्यान, मीनाताई ठाकरे उद्यान, मुख्य रस्त्यावरील जॉगिंग ट्रॅक, श्रीकृष्णनगर, नवीन म्हाडा परिसर, जाधव संकुल येथील तुळजाभवानी पटांगण, कातकाडेनगर परिसर आदी ठिकाणी टवाळखोरांचा दिवसेंदिवस उपद्रव वाढला आहे. भरचौकात दारू पिणे, सिगारेट ओढणे, महिलांची छेड काढणे, शिवीगाळ करणे आदी प्रकार नित्याचेच झाले आहे. त्यामुळे महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.

या त्रासाला कंटाळून मंगळवारी वरदविनायक महिला मंडळासह समतानगर, सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्त नाईकनवरे यांची भेट घेत टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी माजी नगरसेविका पल्लवी पाटील, वंदना खराटे, निर्मला चित्ते, शोभा हासे, चारुलता शिरसाठ, अरविंद पगारे, स्वप्नील पाटील, अक्षय मराठे, प्रवीण जाधव, सतीश हासे, सतीश केदारे आदींसह परिसरातील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित होते.

मोठी दुर्घटना घडण्याच्या अगाेदर बंदोबस्त करा
सातपूर परिसरातील उद्यानांमध्ये टवाळखाेरांच्या या उपद्रवी कृत्यांमुळे महिलावर्गाला फिरणे व व्यायाम-योगा करणे मुश्कील झाले आहे. हे टवाळखोरच गुन्हेगारीला खतपाणी घालतात. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याअगोदरच या टवाळखोराचा बंदोबस्त करावा. - पल्लवी पाटील, माजी नगरसेविका

बातम्या आणखी आहेत...