आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियाेजनशून्य कारभार:प्रशासकीय अनास्थेने फाळके स्मारक भकास,ठिकठिकाणी घाणीचे ढिगारे; गवतही वाढले

नाशिक / जहीर शेख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने उभारलेले फाळके स्मारक नियोजनशून्य कारभारामुळे दुरवस्थेचे केंद्रच बनत आहे. जून महिन्यातच नव्याने सुरू करण्यात आलेल्या या स्मारकात ठिकठिकाणी कचरा साचला असून परिसरातील दुरवस्थेसोबतच प्रेमीयुगुलांचा वावरही येथे वाढल्याने नागरिकांसह पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनामुळे बंद असलेले फाळके स्मारक तब्बल ८२१ दिवसांनंतर जून महिन्यात पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र, १६० दिवसांतच स्मारकाची परिस्थिती खराब झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या स्माकाकडे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष हाेत आहे, यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...

शहरात महापालिकेने उभारलेल्या फाळके स्मारकात अत्याधुनिक साउंड सिस्टिम लावून लघुपट दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. छोटेखानी थिएटरची उभारणी करण्याबरोबरच ठिकठिकाणी शूटिंग करता येईल किंवा पर्यटकांना आनंद लुटता येईल यादृष्टीने झुलते पूल उभारण्यात आले होते. स्थानिक कलावंतांना न्याय मिळण्यासाठी छोटेखानी सभागृह, छोटे व्यासपीठ असलेला मंच आदी बाबींची उभारणी करण्यात आली होती. त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुलांसाठी उद्यानाचीही निर्मिती करण्यात आली होती. मात्र, याकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने स्मारकाची अवस्था बदलत नसल्याचे चित्र आहे. गवताचे साम्राज्य : फाळके स्मारकात कारंजाच्या सान्निध्यात उभारण्यात आलेले थिएटर केव्हा सुरू झाले आणि केव्हा बंद पडले, हे समजलेही नाही. या ठिकाणी असलेल्या झाडांची निगाच राखली न गेल्याने आता ही झाडे नष्ट होऊन या ठिकाणी गवताचे साम्राज्य पसरले आहे.

पाच महिन्यांतच स्मारकाची पुन्हा दुरवस्था : तत्कालीन महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्या पुढाकाराने १६ जूनपासून कोरोनाकाळानंतर फाळके स्मारक सुरू करण्यात आले. आयुक्तांनी या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपस्थित करून देत याकडे लक्ष घालण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, पाच महिन्यांतच पुन्हा स्मारकाची दुरवस्था झालेली असल्याचे चित्र आहे.

ठिकठिकाणी कचराकुंडी स्मारकातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे डी.बी. स्टारच्या पाहणीत समोर आले असून ठिकठिकाणी कचरेचे ढीग साचून त्या ठिकाणी कचराकुंडी निर्माण झालेली असल्याचे चित्र डी. बी. स्टारच्या पाहणीत दिसून आले. स्मारकाची नियमित स्वच्छता होत नसल्यानेच सगळीकडे कचरा साचलेला दिसून आले.

स्मारकात मद्यपींकडून रंगतात पार्ट्या फाळके स्मारकात अगदी दुपारीही मद्यपींकडून पार्ट्या होत असल्याची तक्रार काही नागरिकांकडून करण्यात आली. नागरिकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी मद्य पार्टी केली जात असल्याचे पाहणीत समाेर आले आहे. गेटवर चेकिंग हाेत नसल्याने गुपचूप दारूच्या बाटल्या बॅगमध्ये ठेवून स्मारकात नेल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...