आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाल कांद्याला मिळणाऱ्या नीचांकी भावामुळे कांदा उत्पादक हैराण झालेला असतानाच येथील मातुलठाणमधील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने होळीच्या दिवशीच कांद्याची होळी करत केंद्र व राज्य शासनाचा जाहीर निषेध केला. उपस्थित शेतकऱ्यांनी कांद्याला अग्निडाग देताना केंद्र व राज्य सरकारच्या नावाने बोंबा मारत जाहीर निषेध व्यक्त केला.
डोंगरे यांनी शेतातील कांद्याला होळीच्या दिवशी अग्निडाग देण्याचे निमंत्रण स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. होळीच्या दिवशी सकाळी ११ वाजता या शेतकऱ्याने आक्रोश करत ठरल्याप्रमाणे कांद्याला अग्निडाग दिला. यावेळी डोंगरे यांनी शासनासह लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंब मारत जाहीर निषेध व्यक्त केला. सध्या शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्याचे दर कोसळल्याने कवडीमोल भावाने तो विक्री करावा लागत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक कर्जबाजारी होत आहे. औषध फवारणी, रासायनिक खते, मजुरीसह एक एकर कांद्यासाठी सुमारे दीड लाखाचा खर्च करावा लागताे. काढणीसाठी ३० ते ३५ हजारांचा खर्च करूनही उत्पादन खर्च निघत नाही. यामुळे डोंगरे यांनी कांद्याला अग्निडाग देण्याचा निर्णय घेतला हाेता. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नसल्याची खंत डोंगरे यांनी व्यक्त केली. यावेळी परिसरातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील मातुलठाणमधील शेतकऱ्याचा होळीच्या दिवशी संताप
डोंगरे यांनी सोमवारी आपल्या शेतात होळीच्या दिवशीच आपल्या शेतातील कांद्याची होळी पेटवून राज्य सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचणार
^कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. काढणीचा खर्च कांदा विकून मिळत नसल्याने कांद्याला अग्निडाग देण्याचा निर्णय घेतला. अधिकारी व लोकप्रतिनिधी अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहिले नसले तरी प्रसारमाध्यमांतून कांदा उत्पादकांचा आक्रोश सरकारपर्यंत नक्कीच पोहोचून सरकारला जाग येईल, अशी अपेक्षा आहे.
-कृष्णा डोंगरे, कांदा उत्पादक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.